नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून अचानक हार्ट अटॅक येत मृत्यू येण्याचे प्रमाण वाढले आहे. यात तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे. अलीकडेच एका नववधूचा नवरदेवाने वरमाला घालताच अचानक मृत्यू झाला तर काही कलाकार रंगमंचावर अभिनय करताना अचानक खाली कोसळले. काहींचा नृत्य किंवा व्यायाम करताना अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, हृदयरोगतज्ज्ञांचीही चिंता वाढली आहे. त्यामुळे शरीराला अस्वस्थ करणाऱ्या लक्षणांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. उच्च रक्तदाबाची समस्या जवळजवळ प्रत्येक चौथ्या-पाचव्या व्यक्तीमध्ये सामान्य झाली आहे.
तरुणांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण का वाढले?गेल्या काही वर्षांमध्ये तरुणांमध्ये भावनिक अस्थिरता वाढली आहे. तरुणांमध्ये रक्तवाहिन्यांचा पडदा कमकुवत होत आहे. यामुळे तरुणांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे. कोरोनानंतर तरुणांमध्ये रक्तातील गुठळ्या होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र यामुळे अटॅक येण्याचे प्रमाण किती आहे, यावर अभ्यास सुरु असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
कोरोना महामारीनंतर वाढले प्रमाण...कोरोना महामारीनंतर, अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. जगभरातील देशांच्या आकडेवारीतून हे समोर येते. सार्वजनिक ठिकाणी आणि रुग्णालयात अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. - डॉ. राकेश यादव, एम्सच्या कार्डिओलॉजी विभागातील प्राध्यापक
नेमका धोका कुणाला ?अतिव्यायाम, गोंगाट, झोपेतून अचानक जाग येणे हेदेखील अचानक हृदयविकाराचे कारण बनते. यात लहान मूल तसेच वृद्ध व्यक्तीलाही अटॅक येऊ शकतो. उच्च कोलेस्टरॉल, मधुमेही रुग्णांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका ६० ते ७० टक्के अधिक असतो. कधी-कधी छातीत दुखणे हे अॅसिडिटी म्हणून दुर्लक्षित केले जाते. परंतु ते हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण देखील असू शकते. जर छातीतील दुखणे घशात आणि जबड्यात जाऊ लागले तर ते हृदयविकाराचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.
शरीराचे संकेत कसे ओळखाल?अनियंत्रित रक्तदाबाने हृदयाच्या धमन्या कडक झाल्याने अटॅक येण्याची शक्यता असते. शरीर आपली अशी अचानक फसवणूक करत नाही, ते आधीच विविध लक्षणांद्वारे त्याचे संकेत देते. त्यावर लक्ष ठेवून धोका टळू शकतो, असे तज्ज्ञ म्हणतात.
काय कराल?
- ज्यांना कोरोना झाला आहे त्यांनी व्यायाम सुरु करण्यापूर्वी हृदयाची तपासणी करू घ्यावी.
- पाणी प्रमाणाबाहेर पिऊ नये.
- जास्तीत जास्त फळांचा आहारात समावेश करावा.
- स्ट्रेस मॅनेजमेंट चाचणी करून घ्यावी.
- मद्यपान आणि धूम्रपान कमी करा
- अॅस्पिरिन टॅब्लेट ३०० एमजी कायम तुमच्या खिशात ठेवा.