भूक लागल्यावर आपण कासावीस होतो. आपल्याला काही सुचेनासे होते. कधी एकदा काहीतरी खातोय आणि शांत होतोय, अशी आपली अवस्था असते. अनेकदा राग येऊन चिडचिडही होते. पण तुम्ही कधी विचार केलाय का, तुम्हाला भूक लागल्यावर चिडचिड का होते? एका संशोधनातून यामागील कारण उलगडण्याचा प्रयत्न संशोधकांनी केला आहे. यासाठी 400 पेक्षा जास्त लोकांचा अभ्यास करण्यात आला. संशोधनातून संशोधकांच्या असे निदर्शनास आले की, आपलं व्यक्तिमत्व आणि आपल्या आजूबाजूची परिस्थिती यांमुळे आपली चिडचिड होत असते.
अमेरिकेतील युनिवर्सिटी ऑफ नॉर्थ केरोलाइनातील मॅकोर्माक नावाच्या एका डॉक्टर विद्यार्थीनीने सांगितले की, आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की, भूक लागल्यावर कधी कधी आपल्या भावना आणि आपल्या विचारांवर परिणाम होतो. काही दिवसांपूर्वीच ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये 'हॅगरी' या नव्या शब्दाचा समावेश करण्यात आला आहे. याचा अर्थ होतो की, भूक लागल्यावर चिडचिड होणं.
इमोशनल जनरलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनाच्या मुख्य लेखिका मॅकोर्माकने सांगितले की, आमच्या संशोधनाचा उद्देश भूक लागण्याशी निगडीत असलेल्या भावनांशी संबंधित मानसिक अवस्थेचा अभ्यास करणं हा होता. जसे की, भूक लागण्यासोबतच आपली चिडचिडही होते. यामागील कारणं आणि मनाची अवस्था यांचा अभ्यास करण्यात आला. यामधून असे निष्पन्न झाले की, फक्त भोवतालची परिस्थितीमुळे चिडचिड होत नाही तर बऱ्याचदा चिडचिड होण्यामागील कारण हे भावनात्मकही असतं.