मुंबई- चार पाच जणांचे कुटुंब असो वा मित्रांचा ग्रुप..बाकीच्या सगळ्यांना सोडून डास फक्त मलाच का चावतात असा तुम्हाला प्रश्न पडतो का? किंवा गटामधल्या एखाद्या व्यक्तीलाच नेहमी डास चावतात, बाकीच्या लोकांकडे डास तोंड ( सॉरी सोंड) वर करुनही पाहात नाही असं कधी तुमच्या बाबतीत घडलंंय का?
आपल्यापैकी ठराविक लोकांनाच डास अधिक प्रमाणात का चावतात यावर संशोधक गेली अनेक वर्षे विचार करत आहेत. फ्लोरिडा विद्यापिठात किटकशास्त्राचा अभ्यास करणारे जोनाथन डे यांच्या मताप्रमाणे २० टक्के लोकांकडे डास इतर लोकांपेक्षा अधिक प्रमाणात आकृष्ट होतात. त्यांनी डास चावण्याची काही ढोबळ कारणे शोधून काढली आहेत.
१) रंग- डे यांच्या मतानुसार डास दुपारनंतर अधिक प्रमाणात दुपारनंतर अधिक प्रमाणात दिसू लागतात. रंगावरुन त्यांना मनुष्य शोधणे सोपे जाते. गडद रंगाचे कपडे (काळे, नेव्ही ब्लू, लाल) परिधान करणार्या व्यक्तीकडे ते आकृष्ट होतात.
२) रक्तगट- रक्त हे डासाच्या मादीला लागणारे प्रमुख अन्न. काही रक्तगट डासांना जास्त प्रमाणात आकृष्ट करतात असे दिसून आले आहे. उदाहरणार्थ ओ रक्तगटाच्या व्यक्तींना डास जास्त चावतात असे अभ्यासातून निरीक्षण नोंदवण्यात आले. तसेच आपल्यापैकी ८५ टक्के लोकांकडून डासांना आपण कोणत्या रक्तगटाचे आहोत याचे संकेत मिळत असतात.
३) वायू- कार्बन डाय ऑक्साइडच्या दिशेने डास प्रवास करत येतात. त्याचा गंध डासांना १६० फूट दुरुन येत असतो. जे लोक जास्त कार्बन डाय ऑक्साइडचे उत्सर्जन करतात त्यांच्या दिशेने डास येतात. जाडजूड किंवा आकाराने मोठ्या व्यक्ती इतरांपेक्षा जास्त कार्बन डाय ऑक्साइडचे उत्सर्जन करत असतात. आपण नाक व तोंडावाटे हा वायू बाहेर टाकत असतो, त्यामुळे डास तोंडाच्या दिशेने येतात. आता तुम्हाला काही माणसं, रात्रभर डास कानाशी गुणगुण करत होते अशी तक्रार का करतात ते समजलं असेल.
४) तापमान व घाम- कार्बन डाय ऑक्साइडबरोबर डास घामातून बाहेर पडणार्या लँक्टीक अँसिड, युरिक अँसिड, अमोनिया व इतर संयुगांकडेही आकृष्ट होतात. तसेच तापमान वाढलेल्या शरिराचाही अंदाज चटकन येतो व ते त्या दिशेने जातात.
५) गरोदर महिला- आफ्रिकेतील एका संशोधनानुसार गरोदर महिलांकडे डास अधिक आकृष्ट होतात. कारण गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यांमध्ये त्या इतरांपेक्षा २१ टक्के जास्त कार्बन डाय ऑक्साइड उत्सर्जित करत असतात. तसेच त्यांच्या शरीराचे तापमानही थोडे वाढलेले असते.