२०१९ च्या अखेरच्या महिन्यात अस्तित्वात आलेल्या कोरोना व्हायरसने १ वर्ष थैमान घातलं. अजूनही कोरोना व्हायरस नष्ट झाला नसून जगभरात याने लाखो लोकांचा जीव घेतलाय. सोबतच अनेक देशांचं अब्जो रूपयांचं नुकसानही झालं आहे. हेच कारण आहे की, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोरोना व्हायरसला महामारी घोषित केलं आहे. आता बऱ्याच दिवसांनी चांगली बातमी आली आहे की, कोरोना वॅक्सीन आता लवकरच येणार आहे. पण कोरोना वॅक्सीनची ही बातमी मद्यप्रेमींना निराश करणारी आहे.
जागरण डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, भारतात 'भारत बायोटेक'ची स्वदेशी वॅक्सीन 'कोवॅक्सीन' ला आधीच तयार करण्यात येत आहे आणि ही वॅक्सीन पुढील वर्षाच्या पहिल्या महिन्यात तयार होणार आहे. पण या बातमीने मद्यप्रेमी जरा निराश झाले आहेत. याचं कारण असं आहे की, इंडियन कॉउन्सिल फॉर मेडिकल रिसर्चचे आरोग्य अधिकारी डॉ. समिरन पांडे यांनी सांगितले की, कोरोनाची वॅक्सीन घेतल्यानंतर १४ दिवसांपर्यंत मद्यसेवन करण्यास पूर्णपणे मनाई असणार आहे.
शरीरात मद्य गेल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. हेच कारण आहे की, कोरोनाची लस देणे सुरू होण्याआधीच हे सांगण्यात येत आहे की, वॅक्सीन घेतल्यानंतर १४ दिवस मद्यसेवनापासून दूर रहावं लागेल. मद्यसेवनाबाबत ही बाब फक्त भारतातच नाही तर इतर देशातही लागू होणार आहे.
रशिया हा कोरोना वॅक्सीन देणं सुरू करणारा पहिला देश ठरला आहे. रशियात स्वदेशी वॅक्सीन 'स्पूतनिक वी' तयार झाली आहे आणि रशियात ती देण्याालाही सुरूवात झाली आहे. रशियात सर्वातआधी आरोग्यकर्मी, सुरक्षाकर्मी आणि शिक्षकांना वॅक्सीन दिली जाईल. या देशातही स्पष्ट सांगण्यात आले आहे की, वॅक्सीन घेतल्यानंतर २ महिने मद्यसेवन करू नये.
भारतात कोरोना वॅक्सीन घेण्यासंबंधी मेडिसीनच्या एका तज्ज्ञांनी सांगितले की, वॅक्सीन घेण्याच्या ७ दिवसांआधी मद्यसेवन बंद करावं लागेल. नाही तर याने शरीरात अॅंटी बॉडी तयार होण्यास अडचण निर्माण होईल. आता ही बाब तळीरामांना निराश करू शकते. पण हेही सत्य आहे की, कोरोना व्हायरसला हलक्यात घेऊ नका. ती फार मोठी चूक ठरेल.