आपण कितीही मोठे झालो तरी देखील आपल्यात दडलेलं लहान मुलं नेहमीच बाहेर डोकावत असतं. हे वाक्य अगदी तंतोतंत खरे वाटते ते म्हणजे, जेव्हा आपल्या हातात बबल रॅप येतो, तेव्हा आपण स्वतःला ते फोडण्यापासून थांबवू शकत नाही. ते बबल्स फोडण्यासाठी आपण अगदी उत्सुक होऊन जातो. घरी एखाद्या नवीन वस्तूच्या पॅकेटचे पार्सल आले की, त्या नवीन वस्तूपेक्षा जास्त एक्साइटमेंट ही ती वस्तू रॅप केलेल्या बबल रॅपची असते. कोणीही बबल रॅप हातात घेतलं की, कळत नकळत ती व्यक्ति आपसूकच ते फोडू लागते. परंतु तुम्ही कधी विचार केलाय का, की आपण बबल रॅप फोडण्यासाठी नेहमीच उत्सुक का असतो?
वैज्ञानिकांनी या गोष्टीचा अभ्यास करून याबाबतची काही कारणे शोधली आहेत. आपण जाणून घेऊयात नक्की काय आहेत यामागील कारणे...
पहिले कारण -
स्टडी रिपोर्टनुसार, जेव्हा आपल्या हातात एखादी छोटी वस्तू पडते. तेव्हा आपले मन अस्वस्थ होते. आपल्या आजूबाजूचे वातावरण जर तणावपूर्ण असेल तर आपली अस्वस्थता आणखी वाढते. परंतु आपल्या हातात एखादी लहान वस्तू असेल तर त्यामुळे आपल्या मनाला थोडाफार आराम आणि शांतता लाभते. रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, बबल रॅप फोडता-फोडता कोणतेही काम केले तर त्या कामामध्ये अधिक लक्ष देणे शक्य होते.
दुसरे कारण -
वैज्ञानिकांचे म्हणने आहे की, काही लोक जेव्हा जास्त तणावामध्ये असतात आणि आपल्या समस्यांबाबत विचार करत असतात. त्यावेळी नकळत आपले हात आणि पायांची हालचाल करू लागतात. त्याऐवजी बबल रॅप फोडल्यानेही मनाला शांती मिळण्यास मदत होते.
तिसरे कारण -
बबल रॅप फोडल्यामुळे आपल्या मेंदूला समाधान मिळते. 'डेक्कन क्रॉनिकल' या इंग्रजी वृत्तपत्राने बबल रॅप फोडल्यामुळे मिळणाऱ्या समाधानाला ऑटोनोमस सेंसर मेरिडीयन रिस्पॉन्स (ASMR) असे म्हटले आहे. ज्यामध्ये सांगितले आहे की, बबल रॅप फोडल्यामुळे आपल्या शरिराला एक वेगळेच समाधान आणि आनंद लाभतो. त्यामुळे आपल्या शरिरात निर्माण होणाऱ्या हॅपी हार्मोन्सची पातळीही वाढते. त्यामुळे आपले मनदेखील खुश होते आणि आपण आपल्या ताणतणावांना विसरून जातो.