वाफाळलेल्या चहासोबत अनेकांची सकाळ होते. तर काहींना दिवसांतून खूप वेळा चहा पिण्याची सवय असते. अनेकदा तुम्ही चहा पिण्यासाठी चहाच्या टपरीवर किंवा रेस्टॉरंटमध्ये गेलात, तर आधीच थंड झालेला चहा पुन्हा गरम करून दिला जातो. काही वेळा आपण घरीही असंच करतो. पण असं कधीच करू नका, कारण ते शरीरासाठी खूप धोकादायक ठरू शकतं.
4 तासांपेक्षा जास्त वेळ चहा ठेवला आणि नंतर तो पुन्हा गरम करून पीत असाल तर असं करणं लगेचच थांबावा. उरलेल्या चहामध्ये बुरशी आणि बॅक्टेरियासारखे जंतू वाढू लागतात. यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान होऊ शकतं.
बॅक्टेरिया वाढतात
41 ते 140 डिग्री फारेनहाइट दरम्यान उष्णतेच्या संपर्कात असलेल्या चहामध्ये अन्न विषबाधा करणारे बॅक्टेरिया वाढतात. दुधाच्या चहाच्या बाबतीत तर हे आणखी वाईट आहे. दूध असल्यामुळे बॅक्टेरिया झपाट्याने जमा होतात. फक्त चहा पुन्हा गरम केल्याने ते मरत नाहीत.
सर्व पोषक घटक होतात नष्ट
हर्बल चहाबद्दल सांगायचं तर, पुन्हा गरम केल्यावर त्यातील सर्व पोषक घटक नष्ट होतात. याव्यतिरिक्त, चहामध्ये अनेक आवश्यक गोष्टी असतात ज्या खूप उष्णतेच्या संपर्कात आल्यास पूर्णपणे नष्ट होतात. पुन्हा गरम केल्यावर, त्यातील सर्व पोषक घटक निघून जातात. त्यामुळे असा चहा पिणं धोकादायक ठरतं.
पोटाचे आजार होऊ शकतात
जर तुम्ही चहा पुन्हा गरम करून पिण्याची सवय सोडली नाही तर त्याचा तुमच्या आरोग्याला मोठा फटका बसू शकतो. पोटदुखी, अतिसार, सूज येणे, मळमळ तसेच पचनासंबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.