अनेकांना जेवण केल्यानंतरही काही वेळातच भूक लागते. याकडे फारसं कुणी लक्ष देत नाही. पण यामागे काहीतरी कारण असू शकतं. पण असं नेहमीच होत असेल तर याचं कारण जाणून घेणे आणि ज्या चुका तुम्ही करत आहात त्या न करणे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं राहील.
नाश्ता कमी करणे
जर तुम्ही नाश्ता हलक्या पदार्थांचा केला असेल तर भूक लागणारच. सकाळचा नाश्ता हा आपल्या आरोग्यासाठी फार महत्वाचा मानला जोता. त्यामुळे नाश्ता आवर्जून करण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही नाश्त्यात पौष्टीक आहार घेतला तर दिवसभर तुम्हाला थोडं थोडं खाण्याची इच्छा होणार नाही. सोबतच याने तुम्हाला दिवसभर काम करण्याची एनर्जीही मिळेल. पण जर नाश्ता हलका आणि कमी केला असेल तर तुम्हाला पुन्हा पुन्हा भूक लागेल.
घाई घाईत खाणे
काहीही खात असताना जर ते योग्यप्रकारे खाल्लं नाही तर जेवण केल्यावर तुम्हाला पुन्हा भूक लागणार. जेवण करताना जर तुम्ही घाई घाईने खात असाल तर पुन्हा भूक लागण्याचं हे प्रमुख कारण असू शकतं. त्यामुळे काहीही खाताना ते हळूहळू आणि चाऊन चाऊन खावं. याने तुम्ही खाल्लेले पदार्थांची पचनक्रिया चांगली होते. त्यासोबतच त्यांच्या पोषक तत्वांमुळे तुम्हाला ऊर्जाही मिळेल.
प्रोटीन आणि फायबरची कमतरता
आपल्या शरीरासाठी फायबर खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही तुमच्या पदार्थांमधून योग्य प्रमाणात प्रोटीन आणि फायबर घेत नसाल तर तुम्हाला सतत भूक लागण्याची समस्या होऊ शकते. जेव्हा तुम्ही प्रोटीन आणि फायबर हे तत्व असलेले पदार्थ सेवन करता तेव्हा तुमच्या पोटातून असे हार्मोन्स निघतात जे तुमची भूक शांत करतात.
जास्त चहा पिणे
जर तुम्हाला पुन्हा पुन्हा चहा पिण्याची सवय असेल तर सतत भूक लागण्याची शक्यता अधिक असते. जास्त चहा प्यायल्याने भूक मरते पण तुम्हाला सतत काहीतरी खाण्याची इच्छा होत राहते. चहामध्ये असलेलं निकोटीन व्यक्तीची भूक वेगळ्या प्रकारे वाढवतं. अशांना मसालेदार खाण्याची जास्त आवड होते.
सॉफ्ट ड्रिंक आणि सोडा
अधिक कोल्ड ड्रिंक आणि सोडा पिणाऱ्यांची पचनक्रिया प्रभावित होत असते. हे पेय सतत पिणाऱ्यांना सतत भूक लागू शकते. अनेक अभ्यासातही हे समोर आलं आहे की, जास्त प्रमाणात कोल्ड ड्रिंक किंवा सॉफ्ट ड्रिंक प्यायल्याने भूक जास्त लागते. कारण यात हाय-फ्रक्टोज कॉर्न सीरपचं प्रमाण अधिक असतं. याने रक्तप्रवाह आणि शारीरिक हालचाली वाढतात तसेच भूकही लागते.
कमी पाणी पिणे
योग्य प्रमाणात पाणी पिणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचं आहे. हा भूक शांत करण्याचा सर्वात चांगला पर्याय आहे. अनेकदा योग्य प्रमाणात पाणी न प्यायल्याने शरीरातील पाणी कमी होतं. अशात भूक लागते. पण मुळात तुम्हाला भूक लागलेली नसते. पाणी कमी प्यायल्याने असं वाटत असतं.