सध्या थंडीने चांगलाच जोर धरला असून वातावरणामध्ये गारवा वाढला आहे. त्यामुळे त्वचेसोबतच डोळ्यांच्या समस्यांचाही सामना करावा लागत आहे. अनेकदा वातावरणातील गारव्यामुळे डोळ्यांना कोरडेपणा जाणवतो. त्यामुळे डोळे लाल होणं, खाज येणं यांसारख्या समस्या उद्भवतात. अनेकदा यावर काय उपाय करावे हे सुचतही नाही.
बर्मिघममधील अलबामा युनिव्हर्सिटीतील नेत्र विज्ञान विभागाच्या प्रशिक्षक मारिसा लोकी यांनी सादर केलेल्या हेल्थ डेच्या रिपोर्टनुसार, साधारणतः थंडीमध्ये डोळे कोरडे पडतात, त्यामुळेच डोळ्यांच्या अनेक समस्या उद्भवतात. तसेच त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, याव्यतिरिक्त अधिकाधिक लोकं थंडीपासून बचाव करण्यासाठी आपल्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये हिटरचा वापर करतात. अशातच आधीपासूनच कोरडी असलेली हवा अजून कोरडी होते. याचा परिणाम सर्वात आधी डोळ्यांवर होतो.
संशोधनातून डोळ्यांमधील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या उपायांबाबत सांगण्यात आले, जेणेकरून थंडीमध्ये डोळ कोरडे पडल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांपासून बचाव करणं सोपं होईल. अभ्यासक लोरी यांनी सांगितले की, जर तुम्ही तुलनेने उष्णता अधिक असणाऱ्या ठिकाणी जास्त वेळ घालवत असाल तर वातावरणामध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी ह्यूमिडिफायरचा वापर करा. जास्तीजास्त पाणी किंवा पाण्याचे प्रमाण जास्त असणाऱ्या पदार्थांचे सेवन करा. तसेच शरीर हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे त्वचेसोबतच डोळ्यांचा ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते.
आपल्या चेहऱ्यावर थेट हिटरची हवा येऊ देऊ नका, कारण हिटरमधील गरम हवा सतत चेहऱ्यावर पडल्यामुळे डोळे कोरडे होऊ शकतात. याव्यतिरिक्त गाडीमध्येही याची काळजी घेणं गरजेचं आहे. संशोधनात सांगितल्यानुसार, धूळीचे कण किंवा थंड हवेपासून डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी चश्मा किंवा टोपी वापरणंही फायदेशीर ठरतं.