(Image Credit : www.newstalkzb.co.nz)
चीनमध्ये एका महिलेला फारच अजब आजार झाला आहे. झालं असं की, जर एखादी महिला काही बोलत असेल तर तिला तिचं बोलणं ऐकायला येतं, पण जर एखादा पुरुष काही बोलला तर तिला ऐकायलाच येत नाही. आता तुम्ही म्हणाल की, ती नाटकं करत असेल. पण हे नाटक नसून प्रत्यक्षात झालेला आजार आहे.
या महिलेचं नाव Chen असं आहे. सुरुवातीला तिच्या कानात एक वेगळ्याच प्रकारचा आवाज येत होता. पण त्याकडे तिने वेळीच उपचार करण्याऐवजी दुर्लक्ष केलं. तिला असं वाटलं की, रात्री चांगली झोप होत नसल्याकारणाने असं होत असावं.
नंतर काही दिवसांनी या महिलेला असं जाणवलं की, तिचा बॉयब्रेन्ड तिच्याशी जे बोलतोय, ते ती ऐकू शकत नाहीये. तेव्हा ती घाबरुन डॉक्टरकडे गेली. त्यावेळी डॉक्टरांनी तिला सांगितले की, Reverse-slope hearing loss (RSHL) हा आजार आहे. म्हणजे तिने लो फ्रिक्वेंसीचा ध्वनी ऐकण्याची क्षमता गमावली आहे. महिलांचा आवाज पुरुषांच्या तुलनेत हाय फ्रिक्वेंसीचा असतो. याच कारणामुळे Chen आता केवळ आणि केवळ महिलांचाच आवाज ऐकू शकत आहे. हा एक फारच दुर्मिळ आजार आहे.
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, चेनवर उपचार करणारे डॉक्टर लिन जिआओकिंग म्हणाले की, 'जेव्हा मी तिच्याशी बोलत होतो तेव्हा ती ऐकू शकत होती. पण जेव्हा एखादा तरुण पुरुष रुग्ण आत येत होता, त्याचा आवाज ती अजिबात ऐकू शकत नव्हती. डॉक्टरांचं म्हणणं आहे की, हा आजार अनेकदा आनुवांशिक कारणामुळे होतो. चेनने सांगितले की, ती गेल्या काही दिवसांपासून फारच तणावात आहे. त्यामुळे तिला पुरेशी झोपही घेता येत नाहीये.