मुंबई- ‘क्रोनिक थ्रोम्बोइम्बोलिक पल्मनरी हायपरटेन्शन’ (सीटीईपीएच) या फुफ्फुसाच्या उच्च रक्तदाबाने ग्रस्त असलेल्या रंजना गोंड या 40 वर्षीय महिलेवर ‘कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल’मध्ये (केडीएएच) नुकतीच यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली. ‘सीटीईपीएच’ हा एक जीवघेणा आजार आहे. या आजारात फुफ्फुसात अनेक गुठळ्या होतात, रक्ताभिसरणात अडथळे येतात आणि फुफ्फुसांमध्ये रक्तप्रवाह कमी होतो. तीव्र स्वरुपाच्या फुफ्फुसीय उच्च रक्तदाबामुळे रंजना गोंड या रुग्णाला ‘हार्ट फेल्युअर’ होण्याचा धोका होता. ती चालत असताना तिला श्वास घेणेही कठीण झाले होते. तिच्या फुफ्फुसातील रक्ताच्या गुठळ्या शस्त्रक्रियेने काढून टाकण्याशिवाय गत्यंतर नव्हते. तशी शस्त्रक्रिया दि. 29 डिसेंबर 2020 रोजी करण्यात आली.
‘केडीएएच’मधील हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण विभागाचे संचालक आणि प्रौढ हृदय शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. नंदकिशोर कपाडिया यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही अत्यंत जटील स्वरुपाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. शस्त्रक्रियेनंतर व विश्रांतीनंतर आता ही रूग्ण कृत्रिम ऑक्सिजन न घेता, व्यवस्थित श्वासोच्छवास करू शकत आहे आणि कितीही अंतर मोकळेपणाने चालू शकत आहे. तिला रुग्णालयातून आता डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कोकिलाबेन हॉस्पिटलमधील प्रौढ हृदय शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख व हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण विभागाचे संचालक डॉ. नंदकिशोर कपाडिया म्हणाले, “या रुग्णाला ‘क्रोनिक थ्रोम्बोइम्बोलिक पल्मनरी हायपरटेन्शन’च्या तीव्र गुंतागुंतीचा त्रास होता. तिचे हृदय विफल होण्याच्या (हार्ट फेल) अवस्थेत चालले होते. तिच्या फुफ्फुसांमध्ये रक्तप्रवाह कमी असल्यामुळे, श्वासोच्छवासात अडथळा न येता 100 मीटर चालणेही तिला शक्य नव्हते. अशा परिस्थितीत तातडीचे उपचार आवश्यक होते. तिच्या प्रकृतीचे मूल्यांकन केल्यावर तिला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला. शस्त्रक्रियेतील अतिशय सूक्ष्म असा नाजूकपणा आणि शस्त्रक्रियेनंतर घेतलेली काळजी यांमुळे हे उपचार यशस्वी झाले. शस्त्रक्रियेमुळे फुफ्फुसातील रक्ताभिसरण सुधारले, रक्तामध्ये पुरेसे ऑक्सिजन पोचू शकले आणि हृदयाच्या कार्यामध्ये सुधारणा झाली. रूग्ण तिच्या सामान्य जीवनात परतू शकली.”
शस्त्रक्रियेबाबत बोलताना डॉ. कपाडिया पुढे म्हणाले, “ही शस्त्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या अतिशय अवघड असते. अमेरिकेत दरवर्षी केवळ 300 इतक्याच या शस्त्रक्रिया केल्या जातात. भारतात ही शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण वर्षाला 100 पेक्षा कमी आहे. ही शस्त्रक्रिया वेळेत झाल्यास फुफ्फुसाचे प्रत्यारोपण टाळता येते. ‘सीटीईपीएच’वरील शस्त्रक्रियेसाठी संबंधित रुग्णालयात पल्मनरी, कार्डिओथोरॅसिक, क्रिटिकल केअर, ईसीएमओ, पल्मनरी हायपरटेन्शन आणि पुनर्वसन हे विभाग उत्कृष्ट स्वरुपात असणे आवश्यक आहे.”
डॉक्टर आणि रुग्णालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना रंजना म्हणाल्या, “एका कौटुंबिक सहलीदरम्यान मला माझ्या प्रकृतीत काही बिघाड झाल्याचे जाणवले. मला श्वास घेताना अडचण येत होती. अनेक चाचण्या केल्यावर मला ‘सीटीईपीएच’ असल्याचे निदान झाले आणि शस्त्रक्रिया करण्याची शिफारस करण्यात आली. शस्त्रक्रिया होण्यापूर्वी, मी दम न लागता अजिबात चालू शकत नव्हते. आता शस्त्रक्रियेनंतर मला श्वासोच्छवासाच्या त्रासाशिवाय चालता येत आहे. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी तो फार कठीण वेळ होता. उपचारांच्या संपूर्ण प्रक्रियेत मदत केल्याबद्दल मी डॉ. कापडिया व कोकिलाबेन रुग्णालयाचे मनापासून आभार मानते.”
हिवाळ्यात केसातील कोंडा वाढलाय? 'हे' ४ घरगुती उपाय वापराल; तर कोंडा कायमचा होईल दूर
‘सीटीईपीएच’ या आजारात बहुतांश वेळी लक्षणे दिसत नाहीत. अनेक महिलांच्या पायांच्या नसांमध्ये प्रसूतीनंतर गुठळ्या तयार होतात; परंतु बर्याचदा लक्षणे दिसत नसल्यामुळे या आजाराचे निदान होत नाही. जेव्हा या गुठळ्या आपले स्थान सोडून फुफ्फुसांमधील रक्तवाहिन्यांपर्यंत पोहोचतात, तेव्हा परिस्थिती बिकट होते. रुग्णाचा त्वरित मृत्यू झाला नाही, तरी गुठळ्या फुफ्फुसात राहू शकतात आणि हळूहळू काही काळाने फुफ्फुसांमध्ये दबाव वाढू लागतो. त्यातून फुफ्फुसाचा उच्च रक्तदाब निर्माण होतो. यामुळे हृदयाची उजवी बाजू विफल होऊ शकते. पायात सूज येणे, ओटीपोटात द्रवपदार्थ साचणे, श्वासोच्छवासाचा तीव्र स्वरुपाचा त्रास होणे ही लक्षणे त्यावेळी दिसू लागतात आणि रुग्ण अंथरुणास खिळतो. वेळेत उपचार न केल्यास, यामुळे त्याचा मृत्यू होऊ शकतो.
वजन कमी करण्यासाठी रोज नेमकं किती चालावं? जाणून घ्या कॅलरी बर्न करण्याचा खास फंडा....
या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेमध्ये फुफ्फुसातील रक्तवाहिन्यांमधून गुठळ्या काढून टाकण्यात येतात. रुग्णाला ‘हार्ट-लंग मशीन’वर ठेवण्यात येते. तेथे त्याच्या शरीराचे तपमान 18 अंश सेल्सियस इतके राखून तो विशिष्ट भाग रक्तहीन अवस्थेत ठेवला जातो. मेंदूवर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून, ही प्रक्रिया 60 मिनिटे इतक्या विशिष्ट काळातच उरकावी लागते; कारण या काळात रक्ताभिसरण पूर्णपणे बंद असते. यासाठी विशेष उपकरणे आणि संघकार्य या गोष्टी आवश्यक असतात. संपूर्ण भारतात काही निवडक केंद्रांमध्येच ही शस्त्रक्रिया केली जाते. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय हे अशा केंद्रांपैकी एक आहे.