क्वीन्सलँड : ज्या महिलांचा गर्भपात झाला आहे किंवा ज्यांनी मृत बालकाला जन्म दिला आहे, अशा महिलांना पक्षाघात (स्ट्रोक) होण्याचा मोठा धोका संभवतो, असा निष्कर्ष एका संशोधनातून काढण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियातल्या क्वीन्सलँड विद्यापीठातील संशोधकांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, धमन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्याने रक्तप्रवाह मेंदूपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे पक्षाघात होण्याचा संभव असतो. ब्रिटिश मेडिकल जर्नलने या संशोधनावर आधारित एक लेख प्रसिद्ध केला असून त्यात ही माहिती देण्यात आली आहे. प्रसूतीनंतर तब्येतीला काही गंभीर धोके संभवतात. त्यापासून अनेक महिला अनभिज्ञ असतात. गर्भपात, मृत बाळाला जन्म देणे अशा अवस्थांमध्ये पक्षाघात होण्याची जोखीम वाढते. शरीराला सूज येणे, रक्तप्रवाहासाठी मदत करणाऱ्या एन्डोथिलियल पेशींच्या कामात अडथळे निर्माण होणे अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. या संशोधनामध्ये ६ लाख १८ हजार ८५१ महिलांना सहभागी करून घेण्यात आले. ऑस्ट्रेलिया, चीन, जपान, नेदरलँड, स्वीडन, ब्रिटन, अमेरिका आदी देशांतील महिलांचा त्यात समावेश होता. या महिला ३२ ते ७३ वर्षे वयोगटातील होत्या. या संशोधनात सहभागी झालेल्या महिलांपैकी ९२६५ महिलांना एकदा पक्षाघाताचा सामना करावा लागला होता. (वृत्तसंस्था)
हृदयविकाराचा झटका येण्याचा संभवक्वीन्सलँड विद्यापीठाने केलेल्या संशोधनात सहभागी झालेल्या ९१,५६९ महिलांचा गर्भपात झालेला होता. तर २४,८७३ महिलांनी मृत बाळाला जन्म दिला होता. तीन किंवा अधिक वेळा गर्भपात करणाऱ्या महिलांना कोणतेही नुकसान न करणारा पक्षाघात होण्याचा धोका ३५ टक्के अधिक असतो. अशा महिलांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचाही संभव असतो.