नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे घरी बसून काम (वर्क फ्रॉम होम) करण्याची पद्धत वाढली आणि यामुळे पाठीच्या कण्याची बरीच हानी झाली. कण्याची कोणत्याही प्रकारची हानी ही त्या व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक रूपात प्रभावित करते. पीएमसी लॅबच्या एका संशोधनात म्हटले आहे की, कोविड-१९ मध्ये घरी बसून काम करणाऱ्यांपैकी ४१.२ टक्के जणांनी पाठदुखीची, तर २३.५ टक्के जणांनी मान दुखत असल्याची तक्रार केली.कामाला बसल्यानंतर प्रत्येक तासानंतर ६ मिनिटे पायी चालले तर पाठीच्या कण्याची हानी टाळता येईल. याशिवाय रोज चाइल्ड पोज, कॅट आणि काऊ पोज यासारखी योगासने करावीत, असा सल्ला संशोधनात दिला गेला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या संशोधनात म्हटले आहे की,“स्पाइनमध्ये काही ताण निर्माण झाल्यास त्याचा परिणाम त्या व्यक्तीवर शारीरिक आणि भावनात्मक अशा दोन्ही प्रकारे होतो. सतत वाकून बसल्यामुळे कण्याच्या हाडाची डिस्क आकुंचन पावू लागते. शारीरिक हालचाली कमी झाल्यास कण्याच्या हाडाजवळचे अस्थिबंधन (लिगामेंट) कडक होऊ लागते. यामुळे कण्याच्या हाडातील लवचिकता घटत जाते परिणामी दीर्घवेळ बसल्यावर पाठ दुखू लागते.”पाठीच्या कण्याची हानी टाळण्यासाठी रोज चाइल्ड पोज, कॅट आणि काऊ पोज यासारखी योगासने करावीत, असा सल्ला संशोधनात दिला गेला आहे.खांदे, पाठीच्या मांसपेशींची हानी पाठीच्या कण्याला डोक्याशी जोडणाऱ्या सर्वाइकल वर्टेब्रात तणाव निर्माण झाल्यामुळे मानेत वेदना होऊ लागतात. याचबरोबर खांदे आणि पाठीच्या मांसपेशींची हानी होते. हालचाल न होण्यामुळे मस्तिष्कात पोहोचणारे रक्त आणि प्राणवायूचे प्रमाण घटते. विचार करण्याची क्षमता प्रभावित होते. या पार्श्वभूमीवर घरी बसून काम करणाऱ्यांनी रोज व्यायाम करावा आणि चालावे, असा सल्ला दिला जातो.
‘वर्क फ्रॉम होम’मुळे वाढू लागले पाठीचे आजार; ४१.२ टक्के जणांची पाठदुखीची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 9:09 AM