भाग्यश्री कांबळे
उत्तराखंडमधील उत्तरकाशीस्थित सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या मजुरांची अखेर सुटका झाली. तब्बल १६ दिवस ४१ कामगार त्या बोगद्यात अडकल्याची माहिती होती. १२ नोव्हेंबरपासून या मजुरांच्या सुटकेसाठी दिवसरात्र रेस्क्यू ऑपरेशन सुरु होते. शिवाय कामगारांच्या सुटकेसाठी देशभरातील विविध यंत्रणा उत्तराखंडमध्ये एकवटल्या होत्या. दरम्यान, अथक प्रयत्नानंतर कामगारांची सुटका झाली. या बांधकामाच्या ठिकाणी तात्पुरतं रुग्णालय तयार ठेवण्यात आलं होतं. तसेच या ठिकाणी अँब्युलन्सही होत्या. कारण मुख्य रुग्णालय हे ३० किमीच्या अंतरावर होते. पण या काळात कामगारांना जास्त दुखापत झाली नसली तरी, तज्ज्ञांच्या मते, शारीरिक यासह मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकते.
यासंदर्भात मानसा ग्लोबल फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थच्या संस्थापक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट श्वेता शर्मा सांगतात, 'बोगद्यात अडकलेल्या कामगारांचे शारीरिक चेकअप व्हायलाच हवे. शिवाय मानसिक आरोग्यावरही लक्ष द्यायला हवे. कारण १६ दिवस बोगद्यात अडकल्याने त्यांची इच्छाशक्ती नक्कीच कमी झाली असेल. कामगारांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांचे काउंसलिंग करायला हवे. प्राथमिक उपचारानंतर त्यांची मानसिक स्थिती जाणून घेणं गरजेचं आहे. कारण आपल्याला ठाऊक नाही, त्यांनी १६ दिवस बोगद्यात कसे काढलेत. त्यामुळे त्यांना फक्त प्रेरणा नसून, सोबत इच्छाशक्तीही वाढवण्याची गरज आहे.'
ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ निमेश देसाई सांगतात, 'बोगद्यात अडकलेल्या कामगारांना डिप्रेशन, स्ट्रेस, पॅनिक अटॅक, एंग्जायटी, निद्रानाश किंवा पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर होण्याचा धोका वाढू शकतो. कारण १६ दिवस जगापासून वेगळं राहणं साहजिक त्यांच्यासाठी आवाहनात्मक ठरलं असेल. मुख्य म्हणजे बोगद्यातून बाहेर पडण्याविषयी त्यांच्या मनात भीती घोंघावत असणारच. शिवाय त्यांच्या मनात दरड कोसळणे, वारंवार वाईट स्वप्ने, बोगद्यात अडकण्याची चिंता, या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना याचा त्रास झालाच असेल. त्यामुळे कामगारांनी मनमोकळेपणाने त्यांचे अनुभव शेअर करणं गरजेचं आहे.'