मुंबई : रक्तदान हेच श्रेष्ठदान हे आपण जाणतोच. पण अनेकजण मनातील काही भीतीमुळे, चूकीच्या समजांमुळे त्यापासून दूर राहतात. रक्तदानाबाबत अनेक गैरसमज अनेकांमध्ये बघायला मिळतात. चला जाणून घेऊ काय आहेत हे गैरसमज....
1) मधूमेह असलेले रक्तदान करू शकत नाही - औषध किंवा डाएटच्या माध्यमातून तुम्ही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवल्यास मधूमेह असलेले लोक देखील रक्तदान करू शकतात. मात्र तुम्ही इन्सुलिन घेत असल्यास रक्तदान करू नका.
2) रक्तदान केल्यानंतर मला इंफेक्शन होईल - रक्तदानाच्या वेळेस स्टरलाईज सूई आणि स्वच्छता पाळली जाईल याची दक्षता घ्या. यामुळे इंफेक्शन कमी होईल.
3) रक्तदान करताना खूप रक्त घेतले जाते - वास्तवात रक्तदानाच्या वेळेस फक्त 350 मिली रक्त घेतले जाते. शरीरात सुमारे 5.5 लीटर रक्त असते. रक्तदानानंतर 24 तासात ब्लड व्हॉल्युम पुन्हा रिस्टोर होते.
4) रक्तदानामुळे सेक्स ड्राईव्ह कमी होते - रक्तदानाचा सेक्स ड्राईव्हवर परिणाम होत नाही. रक्तदानाच्या वेळेस पुरेशी काळजी घेतल्यास तुम्हाला थकल्यासारखे वाटणार नाही.
5) रक्तदान वेदनादायी असते - खरंतर रक्तदान त्रासदायक किंवा वेदनादायी नसते. सुई टोचण्याचा त्रास केवळ क्षणिक असतो.
6) स्त्रिया रक्तदान करू शकत नाहीत - जर स्त्रीच्या शरीरातील हिमोग्लोबीनची पातळी 2.5 g% च्या वर असेल, तिची मासिकपाळी चालू नसेल, स्त्री गरोदर किंवा स्तनपान देत नसेल तर नक्कीच रक्तदान करू शकते.