पुणे : ब्रेन ट्यूमर किती प्रमाणात वाढला आहे किंवा त्यावर औषधांचा किती उपयोग झाला आहे, हे पाहण्यासाठी त्याची वेळाेवेळी तपासणी करणे गरजेचे असते. इमेजिंग टेस्ट्स, एमआरआय आणि सिटी स्कॅन या तपासण्या वेळाेवेळी कराव्यात. त्यानुसार उपचार करून ब्रेन ट्यूमरला हरवता येते, असे मत मेंदू विकार शल्यचिकित्सक (न्यूराेसर्जन) देतात.
ब्रेन ट्यूमर्स आणि मेंदूच्या आरोग्याविषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी ८ जूनला ‘वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे’ पाळला जातो. मधुमेहाची सुरुवात झाली व त्याचे वेळीच निदान केले तर लवकर उपचार करून रक्तवाहिन्यांचे होणारे नुकसान टाळता येऊ शकते. याच मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलमुळे मेंदूकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या कोंडण्याची शक्यता निर्माण होते. त्यावरही वेळीच उपचार घ्यावेत.
मेंदूच्या आराेग्यासाठी काही टिप्स
उपचार घ्या : जर ब्रेन ट्यूमरचे निदान झाले तर डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार औषधे, शस्त्रक्रिया, रेडिएशन आणि केमोथेरपी घेणे आवश्यक आहे. कॅन्सरच्या पेशी वाढू नयेत किंवा त्या नष्ट करण्यासाठी टेमोझोलोमाईड आणि कॅरमस्टिन यासारख्या औषधांचा वापर एकत्रितपणे अन्य औषधांबरोबर किंवा वेगवेगळी देऊन उपचार केले जातात.
समतोल आहार आणि पाणी प्या : जीवनसत्वे, ओमेगा ३ फॅटी ॲसिड्स आणि ॲन्टी ऑक्सिडंट्सने युक्त आहार घ्या. फळे, भाज्या, दाणे, बिया आणि फॅटी फिश यामुळे मेंदूची क्षमता वाढते आणि यामुळे मेंदूच्या पेशींचे होणाऱ्या हानीपासून संरक्षण होते.
नियमित व्यायाम करा : व्यायाम केल्याने शरीराकडून मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह सुधारतो, त्यामुळे नवीन न्यूरॉन्स निर्माण होऊन कार्यक्षमतेत वाढ होते. म्हणूनच नियमितपणे आठवड्याला किमान १५० मिनिटे ॲरोबिक व्यायाम, सायकल चालवणे किंवा चालणे यांसारखे व्यायाम करा.
चुकीच्या जीवनशैलीसह, एकाच ठिकाणी अधिक काळ बसून राहणे, अनारोग्यपूर्ण अन्न सेवन आणि अधिक तणाव यामुळे मेंदूच्या आरोग्यावर परिणाम होतो. वेळेत वैद्यकीय उपचार घेतल्यास रुग्णाला अधिक चांगले परिणाम हाेऊन मेंदूशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांची नियमितपणे चाचणी करावी व गरज पडल्यास औषधाेपचार घ्यावेत.
- डॉ. अमित ढाकोजी, कन्सल्टंट न्यूरो सर्जन, मणिपाल हॉस्पिटल बाणेर