आईचं दूध हे बाळासाठी अमृत असतं हे काही वेगळं सांगायची गरज नाही. बाळाला आईचं दूध मिळालं तर त्याशिवाय त्याला दुसरं काहीही देण्याची गरज नसते. पण असं असून देखील आईनं बाळाला उघड्यावर दूध पाजणं म्हणजे आईसाठी जणू श्रापचं असतो. बाळाला जीवनदान देणारी ही महत्त्वाची गोष्ट आईला मात्र लपूनछपून करावी लागते. बऱ्याचदा एका कोपऱ्यात बसून बाळाला दूध पाजण्याचा सल्ला आईला देण्यात येतो. उघड्यावर जर आईनं बाळाला दूध पाजलं तर मात्र तिच्यावर सर्वांच्या नजरा खिळतात आणि तो चर्चेचा विषय बनतो.
1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा आठवडा जागतिक ब्रेस्ट फिडिंग वीक (World Breastfeeding Week) म्हणून साजरा करण्यात येतो. या आठवड्यामध्ये ब्रेस्ट फिडिंगच्या दृष्टीने जनजागृती करणं आणि नवजात बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. स्तनपानाबाबत इतकी जनजागृती करूनदेखील महिलांना लपूनछपून बाळांना दूध पाजावं लागतं. जागतिक ब्रेस्ट फिडिंग वीकच्या निमित्ताने जाणून घेऊयात असे किस्से ज्यांमध्ये महिलांनी आपल्या बाळांना उघडपणे दूध पाजल्याने त्या चर्चेच्या विषय ठरल्या आहेत.
1. मॉडेलनं बाळाला दूध पाजत केला रॅम्पवॉक
काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या मिआमी फॅशन वीकमध्ये अमेरिकेमधील प्रसिद्ध मॉडेल मारा मार्टिनने आपल्या पाच महिन्यांच्या बाळाला ब्रेस्ट फिडींग करत असताना रॅम्पवॉक केलं. हा एक स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड फॅशन शो होता. ज्यामध्ये अनेक मॉडेल्सनी रॅम्पवॉक केलं. यादरम्यान मारा मार्टिनच्या बाळानेही ग्रीन स्विमसूट आणि कानात हेडफोन लावले होते. माराचं रॅम्पवॉक सोडून साऱ्यांचं लक्ष तिच्या बाळावर होतं. या रॅम्पवॉकचा व्हिडीओ सोसल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. जगभरातून यावर अनेक चर्चा झाल्या होत्या. या व्हिडीओला आलेल्या पॉझिटिव्ह रिस्पॉन्ससाठी स्वतः माराने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून थँक्यू पोस्ट लिहिली होती.
2. मल्याळम गृहलक्ष्मीचं मॅग्झिनचं कव्हरपेज
केरळमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि लेखिका गिलू जोसेफ यांच्या मलयालम गृहलक्ष्मी मॅगझीनच्या कव्हरपेजवरून खूप चर्चा झाल्या होत्या. या कव्हरवर छापण्यात आलेला फोटो गिलू जोसेफ यांचा असून त्या बाळाला दूध पाजत होत्या. या फोटोच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला असून हा खटला हायकोर्टात पोहोचला होता. त्यामुळे हे प्रकरण संपूर्ण जगभरात गाजलं होतं. हायकोर्टाने या मॅगझिनच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती. त्यावेळी हायकोर्टानं असं सांगितलं होतं की, काही अश्लील वाटणाऱ्या गोष्टी या इतर लोकांसाठी कलात्मक असू शकतात.
3. बिश्नोई समाजातील महिलेचा हरणाला दूध पाजतानाचा फोटो
सलमान खानचं काळवीट प्रकरण देशभरात फार गाजलं. यामध्ये सलमान विरोधात ज्या समजानं खटला दाखल केला होता त्या समाजातील एका महिलेचा हरणाला दूध पाजतानाच्या एका फोटोवरून जगभरात चर्चा झाली होती. या समाजातील लोकं प्राण्यांवर जीवापाड प्रेम करतात. तसेच ते झाडांना आणि प्राण्यांना आपल्या कुटुंबातीलच एक सदस्य मानतात, त्यांचं रक्षण करतात. या समाजातील महिला आपल्या मुलांप्रमाणेच हरणांनाही आपलं दूध पाजतात. याच बिश्नोई समाजातील एका महिलेचा फोटो शेफ विकास खन्नाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट करत लिहिलं होतं की, राजस्थानच्या बिश्नोई समाजातील महिला जखमी आणि अनाथ हरणांच्या पाडसांना आपलं दूध पाजतात.
4. संसदेत बाळाला दूध पाजणारी खासदार
ऑस्ट्रेलियातील खासदार लेरिसा वॉटर्स यांनी संसदेमध्ये काम करताना आपल्या बाळाला दूध पाजलं होतं. अशा अनोख्या मातृत्वाची सोशल मीडियावर चर्चा झाली असून अनेक लोकांनी या प्रकरणाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला होता.
5. राम तेरी गंगा मैली
'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटातील अभिनेत्री मंदाकिनी हिचा स्तनपान करतानाचा प्रसंग फार गाजला होता. त्या दशकामध्ये अशाप्रकारचे बोल्ड सीन सहसा दाखवले जात नसत. त्यावेळी अभिनेत्री मंदाकिनी यांचा बाळाला दूध पाजतानाचा सीन प्रेक्षकांच्या पचनी पडला नव्हता. या सीनची त्यावेळी फार चर्चा झाली होती.