अतुल चिंचली-पुणे : सध्याच्या युगात पौष्टिक अन्न, हिरव्या पालेभाज्या, फळे खाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे प्रतिकारशक्तीही कमी झाली आहे. जंक फूड खाण्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. कर्करोग हा कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो. पण शारीरिक तंदुरुस्तीसाठी उपयोगी असणारे पौष्टिक अन्नाचे सेवन आणि व्यायाम केला, तर आपली प्रतिकारशक्ती वाढून ती आपल्याला कर्करोगापासून दूर ठेवते, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.जागतिक कर्करोग दिनानिमित्त डॉक्टरांशी ‘लोकमत’ने याविषयी संवाद साधला. दरवर्षी भारतात सुमारे सात लाख लोकांना कर्करोगाची लागण होते. त्यामध्ये सुमारे चार लाख तोंडाच्या कर्करोगाचे रुग्ण असतात. तंबाखूसेवनाने सुमारे २ हजार बळी जातात.
भारतातील सरकारी रुग्णालयाच्या २०१९ च्या आकडेवारीनुसार वर्षभरात सुमारे ४ लाख लोकांना तोंडाच्या कर्करोगाची लागण झाली आहे. सुमारे दोन लाख महिलांना स्तनकर्करोगाची लागण झाली आहे. सुमारे तीन लाख महिलांना गर्भाशय कर्करोगाची लागण झाली आहे.मानवी शरीरात कार्सिनोजीन नावाचा घटक असतो. काही लोकांमध्ये तो सक्रिय, तर काहींमध्ये तो निष्क्रिय असतो. हा घटक सक्रिय असणाऱ्या लोकांमध्ये कर्करोग होण्याची जास्त शक्यता असते. पण निष्क्रिय असणाऱ्या लोकांमध्ये कर्करोग होण्याची शक्यता कमी असते. हा घटक सक्रिय असणाऱ्या लोकांनी तंबाखू खाल्ल्याने त्यांना लवकरच तोंडाचा कर्करोग होतो. कार्सिनोजीन मानवी शरीरात सक्रिय असतो की निष्क्रिय, यावर संशोधन सुरू आहे. अद्याप त्यावर निष्कर्ष आलेला नाही.शरीरात आतडे, तोंड, जीभ, ओठ, घसा, स्वरयंत्र अशा कर्करोगाच्या जागा आहेत. महिलांच्या गर्भाशय आणि स्तन कर्करोगात वाढ होत असून पुरुषांनाही प्रोस्टेट कर्करोगाला सामोरे जावे लागत आहे. नागरिक मिसरी, तंबाखू, गुटखा, तपकीर, बिडी, सिगारेट, मावा, जर्दा, पानमसाला अशा सवयींमुळे तोंडाच्या कर्करोगाला बळी पडत आहेत. महिलांनी स्तन कर्करोगापासून दूर राहण्यासाठी मॅमोग्राफी तपासणी करून घेणे गरजेचे आहे. गर्भाशय कर्करोग होऊ नये, म्हणून पॅप स्मिअर तपासणी करून घ्यावी. महिलांनी वयाच्या ४० ते ५० वयोगटात या तपासण्या कराव्यात. पुरुषांनी प्रोस्टेट कॅन्सर होऊ नये, म्हणून सोनोग्राफी तपासणी करावी.......आता तरुण मुलांमध्ये आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंबाखू खाण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवर कर्करोगाबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे गर्भवती महिलांनी तंबाखू खाणे टाळायला हवे. त्यामुळे बाळाला टीबी किंवा फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता असते.- डॉ. मिलिंद भोई, समन्वयक, ध्यासपंथ कॅन्सर निवारण प्रकल्प, शेठ ताराचंद रुग्णालय.............मी २४ वर्षांचा असताना तंबाखू खाण्यास सुरुवात केली. मला वयाच्या ४७ व्या वर्षी कर्करोग झाल्याचे कळाले. कर्करोगावर उपचार घेत असताना अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागत होते. तंबाखू हे आपले आयुष्य नाही. कर्करोगासारख्या आजारातून मुक्त होणे फारच अवघड असते. म्हणूनच सर्वांनी व्यसन न करता आयुष्य जगावे. या कर्करोगातून उपचार घेऊन मी बाहेर आलो आहे. - किरण पाटील (नाव बदलले आहे) ...........* तोंडाच्या कर्करोगाची लक्षणेवारंवार तोंड येणे, लाळ गळणे, तिखट सहन न होणे, त्वचा काळी पडणे, आवाज घोगरा होणे, तोंडाची आग होणे, तोंडातील जखम भरून न येणे, तोंड उघडताना त्रास होणे.
* स्तन कर्करोगाची लक्षणेहाताला गाठ लागणे, दुखणे
............
* गर्भाशय कर्करोगाची लक्षणे अनियमित मासिक पाळी, अतिरिक्त रक्तस्राव