डायबिटीज एक गंभीर आजार आहे. याकडे दुर्लक्ष केलं तर अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. सध्या देशासह संपूर्ण जगभरातही या आजाराने ग्रस्त असलेल्या रूग्णांची संख्या वाढत आहे. मोठ्या माणसांसोबतच अनेक लहान मुलांमध्येही या आजाराची लक्षणं दिसून येत आहेत. या आजाराची लक्षणं लहान मुलांमध्ये का दिसून येत आहेत? आणि या आजाराची लक्षणं कशी ओळखावी? याबाबत जाणून घेऊया...
अनेक लहान मुलं मधुमेहाने ग्रस्त
बदललेली जीवनशैली, जंकफूड आणि कमी शारीरिक श्रम या कारणांमुळे लहान मुलांमध्येही मोठ्या आजाराची लक्षणं दिसून येत आहेत. हा आजार होण्याचं कारण बऱ्याचदा आनुवंशिक असतं. त्याचप्रमाणे बदललेली आणि धावपळीची जीवनशैली हेदेखील कारण ठरतं. ज्या मुलांच्या आई-वडिलांना डायबिटीज आहे त्या मुलांमध्ये डायबिटीज होण्याचा धोका वाढतो. भारतामध्ये 10 लाखांपेक्षा जास्त मुलांना टाइप-2 डायबिटीज आहे. प्रत्येक वर्षी जवळपास 80 हजार मुलं मधुमेहाने ग्रस्त होतात. दरवर्षी या संख्येत वाढ होत आहे.
ही आहेत लक्षणं
जर तुमच्या मुलांना सतत तहान- भूक लागत असेल किंवा सतत लघवी करण्याची इच्छा होत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. मधुमेह हा फार घातक आजार असून लहान मुलांना तो झाला तर त्याचा परिणाम त्यांचे डोळे आणि किडनीवर होऊ शकतो. असं देखील आढळून आलं आहे की, मधुमेहाने पीडित असलेल्या मुलांमध्ये एनर्जी लेव्हल फार कमी असते. त्यांना थकवा लगेच येतो.
असा करा बचाव
मधुमेहापासून बचाव करण्याचा सर्वात उत्तम पर्याय म्हणजे आहाराकडे व्यवस्थित लक्ष देणं. आपल्या मुलांच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, हंगामी फळं आणि डाळींचा समावेश करा. लहानपणापासूनच त्यांना शारीरिक श्रमाची म्हणजेच अॅक्टिव्ह राहण्याची सवय लावा.
अॅक्टिव्ह राहण्यासाठी व्यायामाची सवया लावा
लहान मुलांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी व्यायाम फायदेशीर ठरतो. त्यामुळे त्यांना दररोज सकाळी उठून व्यायाम करण्याची सवय लावा. दिवसभर घरामध्ये राहून टीव्ही किंवा कंम्प्यूटरसमोर बसण्याऐवजी त्यांना मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रवृत्त करा. त्यामुळे शरीराचा व्यायाम होईल.
डॉक्टरांचा सल्ला घ्या
जर आई-वडीलांपैकी कोणाला मधुमेह असेल तर मुलांनाही डायबिटीज होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य त्या तपासण्या करून घेणं आवश्यक असतं.