राजानंद मोरे
पुणे : मधुमेहाचा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना आता या आजाराचा विळखा कुमारवयातच पडू लागल्याचे पुण्यातील एका अभ्यासातून समोर आले आहे. त्यातही या वयातील मुलांपेक्षा मुलींमध्ये टाईप २ मुधमेहाचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. बदलत्या जीवनशैलीबरोबरच या आजाराच्या लक्षणांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे हे प्रमाण वाढत असल्याचा निष्कर्ष अभ्यासातून काढण्यात आला आहे.
मागील काही वर्षांपासून भारतात मधुमेहग्रस्त रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यामध्ये बैठे काम असलेली जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे टाईप २ प्रकारचा मधुमेह होतो. भारतीयांमध्ये तो तुलनेने कमी वयोगटांत म्हणजे १८ ते ३० वर्षे या वयोगटात आढळून येत आहे. एका खासगी संस्थेने पुणे शहरातील त्यांच्याकडे आलेल्या १२ हजार १८२ जणांच्या मधुमेहाबाबतच्या माहितीचा अभ्यास केला. ही माहिती सप्टेंबर २०१७ ते आॅगस्ट २०१८ या कालावधीतील आहे. या अभ्यासानुसार २० वर्षांखालील दहा टक्के मुलींना मधुमेहाचा विळखा पडला आहे. तर तेवढ्याच मुली काठावर आहेत. त्यातुलनेत ८ टक्के मुले मधुमेहग्रस्त असून ५ टक्के काठावर आहेत. वयोगट वाढत गेल्यानंतर ही स्थिती उलटी झाली आहे. पुरूषांमध्ये तुलनेने मधुमेह अधिक आढळून आला आहे.
मधुमेहाच्या रुग्णांपैकी नव्वद टक्के रुग्णांना दुसऱ्या प्रकारचा मधुमेह असतो. हा मधुमेह प्रामुख्याने पन्नाशीनंतर होतो. पण बदलत्या जीवनशैलीमुळे कमी वयातही याची लक्षणे दिसू लागल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. ताणतणाव, बैठे काम असलेली जीवनशैली आणि लठ्ठपणा ही स्त्रियांमध्ये मधुमेह वाढण्याची काही प्रमुख कारणे आहेत. इंडस हेल्थ प्लसचे सह व्यवस्थापकीय संचालक अमोल नायकवडी म्हणाले, तरुण पिढीमध्ये उद्भवणाऱ्या मधुमेहाच्या वाढत्या संख्येमुळे या रोगासाठी कुठलेही सुरक्षित वय नाही हे दिसून येते. अल्पवयात होणाऱ्या मधुमेहाची योग्य ती काळजी घेतली पाहिजे आणि त्यासाठी उपचाराचे गंभीरपणे नियोजन केले पाहिजे. जीवनशैलीतील बदल, रोजचा व्यायाम, पोषक आहाराचे सेवन, तपासणी अशा याकडे दुर्लक्ष होऊ नये. डोळ्यांचा विकार बळावतोय
मधुमेहामुळे डायबेटिक मॅक्युलर एडेमा (डीएमई) नावाचा डोळ्यांचा विकार बळावत आहे. रुग्णांतील जागृतीचा अभाव आणि या आजारांशी संबंधित उपचारांच्या माहिती बाबत अज्ञान हे त्यामागचे कारण आहे. मधुमेही युवकांनी दर ६ महिन्यांनी डोळे तपासणी करणे आवश्यक असते. सध्या उपलब्ध अद्ययावत उपचार पद्धतींव्दारे त्यावर नियंत्रण मिळवता येवू शकते.
( डॉ. नितीन प्रभुदेसाई, नेत्ररोगतज्ज्ञ)