जगभरामध्ये 7 एप्रिल हा दिवस वर्ल्ड हेल्थ डे म्हणजेच, जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस आरोग्यासंदर्भात लोकांच्या मनात जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा करण्यात येतो. वर्ल्ड हेल्थ आर्गेनाईजेशन (World Health Organization) द्वारे पहिल्यांदा 1950मध्ये वर्ल्ड हेल्थ डे साजरा करण्यात आला होता. तेव्हापासून प्रत्येक वर्षी 7 एप्रिल हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये 'वर्ल्ड हेल्थ डे' म्हणून साजरा करण्यात येतो. याचेच औचित्य साधून अनेक सरकारी आणि प्रायव्हेट फर्म्समध्ये तसेच एनजीओतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
'वर्ल्ड हेल्थ डे'साठी थीम (World Health Day 2019 Theme and Slogan)
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 'वर्ल्ड हेल्थ डे'साठी एक थीम ठरविण्यात आली आहे. ती म्हणजे, 'Universal health coverage: everyone, everywhere'. याचाच अर्थ जगाच्या कोणत्याही ठिकाणी अथवा शहरामध्ये प्रत्येक नागरिकाला आरोग्याशी निगडीत सर्व सुविधा मिळाव्यात. मागील वर्षी म्हणजेच, 2018मध्ये 'वर्ल्ड हेल्थ डे'साठी थीम 'यूनिवर्सल हेल्थ कवरेज' ही होती. यातंर्गत जगभरातील लोकांना त्यांच्या आरोग्याबाबत जागरूक राहण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले होते.
सध्याच्या या धावपळीच्या जीवनामध्ये लोक आपल्या आरोग्यावर पूर्ण लक्ष देऊ शकत नाहीत. ज्यामुळे त्यांना अनेक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच 'लोकमत न्यूज.इन'ने दिलेल्या वृत्तानुसार, एका प्रसिद्ध फिजिशयन डॉक्टरांनी अशा 5 पद्धतींबाबत सांगितले आहेत, ज्यांचा दैनंदिन जीवनात समावेश करून तुम्ही निरोगी राहू शकता. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, या उपायांचा आपल्या डेली रूटिनमध्ये समावेश केल्याने जवळपास 25 आजारांपासून स्वतःचा बचाव करणं सहज शक्य होतं.
1. शांत आणि पूर्ण झोप
सर्वात आधी तुम्ही शरीराला शांत आणि पूर्ण झोप देणं गरजेचं असतं. रात्री शरीराला आराम देण्यासाठी असते. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत जागणं टाळा. शरीराला फ्रेश आणि अक्टिव्ह ठेवण्यासाठी झोप उत्तम औषध आहे. कमी झोप घेतल्यामुळे मानसिक स्थितीवर त्याचा वाईट परिणाम होतो. याव्यतिरिक्त शरीराला वेदना आणि थकवा जाणवतो. वजन वाढतं आणि तणाव यांसारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच अपूर्ण झोपेमुळे डायबिटीज, ऑस्टियोपोरोसिस, कॅन्सर आणि हार्ट अटॅक यांसारख्या आजारांचाही धोका वाढतो.
2. जास्त खाऊ नये
भूक नियंत्रित ठेवा आणि जास्त खाऊ नका. फिट राहण्यासाठी मानसिकरित्या हेल्दी डाएट घेण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करा. नेहमी तुम्ही आहारातून किती कॅलरींचे सेवन करता याबाबत लक्ष ठेवा. तुमच्या शरीराला आवश्यकतेनुसार कॅलरी दिल्याने तुमचं वजन नियंत्रणात ठेवण्यासोबतच निरोगी राहण्यासही मदत होइल.
3. मानसिक आरोग्य सांभाळा
तणाव, चिंता किंवा डिप्रेशन यांसारखी लक्षणं दिसत असतील तर लगेच डॉक्टरंचा सल्ला घ्या. तसेच एकटं राहण्याऐवजी तुमच्या जवळील व्यक्तींशी संवाद साधा. जर तुम्हाला मदतीची गरज असेल तर कोणताही संकोच मनात न ठेवता मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या. मानसिक आरोग्याकडे दुर्लक्षं केल्याने अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
4. जास्त प्रमाणात प्रोटीन घेतल्याने
प्रोटीनयुक्त अन्नपदार्थ म्हणजेच, डाळ, दूध, दही, पनीर यांसारख्या डेअरी उत्पादनांचे सेवन करा. अंड्यांमध्येही मुबलक प्रमाणात प्रोटीन असतं.
5. व्यायाम करा
दररोज व्यायाम करा. वॉक घेणं. जॉगिंग, सायकलिंग यांसारख्या अॅक्टिव्हिटींचा तुमच्या दैनंदिन जीवनात समावेश करा. व्यायाम फक्त तुम्हाला फिट राहण्यासाठी नाही तर हृदयाशी निगडीत आजार आणि कॅन्सर यांसारख्या आरोग्याच्या गंभीर समस्यांपासून दूर राहण्यासाठी मदत करतं. त्यासाठी व्यायामाचा डेली रूटिनमध्ये समावेश करा.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असून यातून आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.