मंकीपॉक्सचा प्रसार हा अत्यंत वेगाने होत आहे. कोरोना संकटाच्या काळात या धोकादायक आजाराने जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. हा रोग 12 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे आणि आतापर्यंत 100 हून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. मात्र, आतापर्यंत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, मंकीपॉक्स व्हायरस हा चिकनपॉक्ससारखाच ऑर्थोपॉक्स व्हायरस आहे. त्याची लक्षणे देखील सौम्य असतात. मंकीपॉक्स हा एक असा आजार आहे जो प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरतो.
मंकीपॉक्सची प्रकरणे बहुतेक उष्णकटिबंधीय वर्षावनांच्या जवळ आढळतात, जिथे व्हायरसची लागण होणारे प्राणी असतात. खारूताई, उंदीर, माकडांच्या विविध प्रजाती आणि इतर प्राण्यांमध्ये मंकीपॉक्स व्हायरसच्या संसर्गाचे पुरावे सापडले आहेत. मंकीपॉक्सची लक्षणं नेमकी काय आहेत ते जाणून घेऊया...
ताप हे मंकीपॉक्सचं सामान्य लक्षण
मंकीपॉक्समध्ये सर्वप्रथम ताप येतो आणि त्यानंतर रुग्णाच्या शरीरावर कांजण्यांसारखेच फोड दिसतात. मंकीपॉक्स हा कांजण्या, गोवर, खरुज आणि औषधांसंबंधित ऍलर्जी यांसारख्या इतर रोगांपेक्षा वेगळा आहे.
तापानंतर त्वचेच्या समस्या
तापानंतर रुग्णाला त्वचेच्या समस्या जाणवत आहेत. जसं शरीरावर पुरळ उठू शकते, जे 2 ते 4 आठवडे दिसू शकते. मंकीपॉक्सचा इन्क्यूबेशन पीरियड म्हणजे लक्षणं दिसण्याची वेळ, 5 ते 21 दिवसांपर्यंत असू शकते. या आजारात ताप साधारणपणे 1 ते 3 दिवस राहतो.
मंकीपॉक्सची 'ही' आहेत 6 गंभीर लक्षणं
- ताप येतो- डोकेदुखी- लिम्फॅडेनोपॅथी (लिम्फ नोड्सला सूज)- पाठदुखी- मायलगिया (स्नायू दुखणे)- इंटेंस अस्ठेनिया (ऊर्जेचा अभाव) सारखी अनेक लक्षणे जाणवू शकतात
मंकीपॉक्सची लक्षणे उपचार न करता स्वतःहून बरी होतात. तोंड किंवा डोळे येथील कोणत्याही फोडांना स्पर्श करणे टाळा. कॉर्टिसोन असलेली उत्पादने टाळा. तोंड स्वच्छ धुवा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.