- अमृता कदम
कमीत कमी वेळेत आरामदायी प्रवासाचा सर्वांत उत्तम पर्याय म्हणजे विमान प्रवास. त्यामुळेच अनेक जण बाय रोड किंवा ट्रेननं प्रवास करण्याऐवजी हवाई सफरीला प्राधान्य देतात. परदेशी प्रवासासाठी तर विमानप्रवासाला पर्यायच नाही! पण वारंवार केलेला विमान प्रवास किंवा जास्त अंतराचा वेळखाऊ विमान प्रवास केल्यानंतर जेट लॅगही सहन करावा लागतो. थकवा आणि चक्कर येणं, अनिवार झोप यांमुळे प्रवासाच्या आनंदावर विरजण पडतं. जेट लॅगचा आरोग्यावरही विपरित परिणाम होताना दिसतो. जागतिक आरोग्य संघटनेनं अनेकांना जेट लॅगमुळे अपचन, ब्लड प्रेशरमध्ये अचानक होणारे चढ-उतार यासारख्या समस्यांना सामोरे जावं लागत असल्याचं म्हटलं आहे. जेट लॅग टाळून जर प्रवासातील ऊर्जा वाचवायची असेल आणि आरोग्यही सांभाळायचं असेल तर काही खबरदारीचे उपाय नक्की घ्यायला हवेत. पुढच्यावेळेस जेव्हा लांबचा विमान प्रवास कराल, तेव्हा या काही टीप्स आवर्जून लक्षात ठेवा. तुमचा प्रवासाचा कंटाळा दूर व्हायला याची नक्की मदत होईल.
जेट लॅग टाळायचा असेल तर
1. तुम्ही तुमचं बॉडी क्लॉक प्रवासाच्या गरजेनुसार बदलायला हवं. लांबच्या प्रवासाला निघण्याआधी किमान तीन दिवस तुम्ही तुमच्या झोपेच्या वेळा बदलून पाहा. तुम्हाला ज्या देशात जायचं आहे, तिथल्या स्थानिक वेळेचा हिशोब करु न तुम्ही साधारण दोन ते तीन तासांनी तुमच्या झोपेच्या वेळापत्रकात फेरफार करु शकता.
2. Split-trip चा पर्यायही तुम्ही विचारात घेऊ शकता. त्याच्यामुळे तुमच्या शरीराला नवीन रूटिनशी जमवून घ्यायला सोपं जाईल. शिवाय तुमचा प्रवासाचा खर्चही वाचेल. हा अजून एक फायदा!
3. जेव्हा तुमचा प्रवास खूप लांबचा असेल, तेव्हा विमान प्रवासात अल्कोहोल आणि कॅफेनचं सेवन टाळलेलं केव्हाही चांगल. त्याऐवजी तुम्ही सतत पाणी पित रहा. तुमचं शरीर जितकं हायड्रेटेड राहील तितकं चांगलं.
4. पोहचल्यावर हॉटेलमध्ये जाऊन मस्तपैकी ताणून द्यायची हा विचार मनातून आधी काढून टाका. हा उपाय थोडासा अव्यवहार्य वाटेल. पण तुमचा जेट लॅगचा त्रास कमी व्हायला त्याची नक्की मदत होईल. पोहचल्यावर हॉटेलच्या आवारातच फेरफटका मारा. आणि हो विमानातही जर झोप घेणं टाळता आलं, तर अधिक उत्तम!
5. जेव्हा तुम्ही तुमच्या हॉटेलमध्ये पोहचाल, तेव्हा चादरीमध्ये गुरफटून जाण्याऐवजी खोलीच्या खिडक्या मस्तपैकी उघडा आणि प्रकाश-मोकळी हवा आत येऊ द्या. तुम्हाला ताजंतवानं वाटेल.
6. सगळ्यांत महत्त्वाचं तुमचं व्यायामाचं रूटिन चुकवू नका. कारण व्यायामामुळे शरीराची परिस्थितीशी जुळवून घेण्याची लवचिकता वाढते. त्यामुळे प्रवासात आणि एरवीही व्यायाम न चुकवणं तुमच्यासाठी नेहमीच फायदेशीर ठरेल. पुढच्यावेळेस जेव्हा लांबचा विमान प्रवास कराल, तेव्हा या काही टीप्स आवर्जून लक्षात ठेवा. तुमचा प्रवासाचा कंटाळा दूर व्हायला नक्की मदत होईल.