- स्नेहा मोरेबदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनारोग्यकारक खाण्यावर नियंत्रण ठेवा आणि व्यायाम करूनजीवनशैली ‘हार्टफ्रेंडली’ ठेवा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत. २९ सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो. सध्या जगभरात हृदयरोगांमुळे सर्वाधिक मृत्यू होत आहेत. यंदा ‘माझे हृदय, तुझे हृदय’ अशी जागतिक हृदय दिनाची संकल्पना असून स्वत:च्या हृदयाचे स्वास्थ्य जपताना आपल्या भोवतालच्या लोकांच्या हृदयाची आपण काळजी घेतली पाहिजे हा विचार यातून मांडला आहे.वर्ल्ड हार्ट फेडरेशनच्या आकडेवारीनुसार दरवर्षी १ कोटी ७३ लाख लोक हृदयरोगाने मृत्युमुखी पडतात. भारतातील एकूण मृत्यूंपैकी २५ टक्के मृत्यू हृदयरोगाने होत असतात. गेल्या काही दशकांपासून हृदयरोगाचे प्रमाण तरुणांमध्ये वाढत असल्याचे दिसून आले आहे. पाश्चिमात्य जगाच्या तुलनेत भारतामध्ये वयाच्या १० वर्षे आधी हृदयरोग होताना दिसू लागले आहेत. ज्यांना हृदयरोग होतो, अशा लोकांपैकी एक चतुर्थांश लोक हे ३० ते ५० वर्षे वयोगटातील आहेत. हृदयविकाराचा धोका असलेल्यांचा वयोगट ज्या रीतीने कमी होऊ लागला आहे, त्यावरून यापुढे वयाच्या विशीतच हृदयरोग झाल्यास नवल वाटू नये अशी परिस्थिती आहे. जीवनशैलीत हळूहळू, पण मोठ्या प्रमाणावर बदल झाल्यामुळे हृदयरोग लहान वयात होताना दिसत आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे अनारोग्यपूर्ण खाण्याची सवयही त्याला कारणीभूत असल्याने लहान मुले आणि मध्यम वयातील लोकांमध्ये याचे प्रमाण वाढत आहे. लहान मुलांमधील स्थूलता मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्याने त्यांच्यातही हृदयरोगाचे प्रमाण वाढू लागले आहे.आजकाल शहरातील गतिमान जीवनामुळे सगळेच जण खूप बिझी झाले आहेत. नोकरी-धंद्यामुळे माणसाला आपल्या जेवणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. रोजचा भरपूर प्रवास, खूप वेळ घराबाहेर राहणे, यामुळे खूप वेळा बाहेर हॉटेलमध्ये जेवण हा त्याच्या जीवनाचा अविभाज्य आणि अपरिहार्य भाग झाला आहे. रात्रीच्या पार्ट्या, वीकेण्डचे आउटिंग, हॉटेलिंग ही आज खूप जणांची एक जीवनशैली झाली आहे. रेडिमेड फूड्स, पॅकेज्ड फूड, प्रोसेस्ड फूड, फास्ट फूड, जंक फूड खाणे हा प्रकार रोजचाच होत आहे. ही बदलती खाद्य संस्कृती नकळतपणे अनेक आजारांना साद देत आहे, आमंत्रण देत आहे. आपण ज्या पर्यावरणात राहतो, त्याचा आपल्या जीवनावर थेट परिणाम होत असतो. त्यामुळे आपले पर्यावरण हे ‘हार्टफ्रेंडली’ बनवणे हे आपले कर्तव्य आहे.या गोष्टींचा अवलंब करानियमित ३० मिनिटांचा व्यायाम : शारीरिक व्यायाम वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. तसेच यामुळे हृदयावर ताण येणारी स्थिती म्हणजेच, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल व मधुमेह वाढण्याची शक्यता कमी होते.ठरावीक कालावधीनंतर व नियमितपणे प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी करणे : रक्तदाब व कोलेस्टेरॉलचा स्तर नियमितपणे तपासून घ्या. कारण त्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांना हानी पोहोचू शकते. तथापी, यांचं प्रमाण सामान्य स्तरावर नसेल किंवा हृदयाशी संबंधित आजाराची इतर लक्षणे आढळून आली तर वारंवार त्यांची तपासणी करत राहिली पाहिजे. खासकरून कौटुंबिक इतिहासामध्ये कुणाला मधुमेह असेल तर रक्तातील शर्करेचे प्रमाण योग्य आहे का याची तपासणी करून घेतली पाहिजे.हृदय स्वस्थ ठेवणाऱ्या आहाराचे सेवन करा : पौष्टिक आहाराचे सेवन करा. कोलेस्टेरॉल, चरबीयुक्त पदार्थ व मिठाचे प्रमाण कमी असलेल्या आरोग्यपूर्ण समतोल आहाराचे सेवन करावे. अळशी, बदाम, ओटमील, ब्राउन राइस, पालक, अक्रोड, टोमॅटो, मासे इत्यादींचा समावेश आहारामध्ये करावा.वयोमानानुसार आपले वजन नियंत्रित ठेवा : जसजसे वय वाढते तसतसे वजनही वाढते. योग्य आहार आणि बागकाम, घराची साफसफाई, नृत्य इत्यादी शारीरिक हालचालींद्वारे वजन आटोक्यात ठेवा.आवश्यक झोप घ्या : रात्री ७-८ तास झोप घ्या. तसेच ९ तासांपेक्षा जास्त वेळ झोपू नका.धूम्रपान व तंबाखू सेवन टाळा : धूरविरहित तंबाखूसहित सर्व प्रकारच्या तंबाखू उत्पादनांपासून लांब राहा. तंबाखूमध्ये असलेली रसायने हृदय व रक्तवाहिन्यांना हानी पोहोचवतात. यामुळे तुमच्या हृदयातील धमण्या अरुंद होऊ शकतात. सिगारेटमध्ये असलेले निकोटिन रक्तवाहिन्या अरुंद करते, ज्यामुळे तुमच्या हृदयावर ताण येऊ शकतो. सर्वांवर जीवनामध्ये व्यावसायिक व वैयक्तिक जबाबदाºया असतात. पण, सर्वात मुख्य जबाबदारी आपल्या स्वत:च्या शरीराची काळजी ही आहे. कारण, जीवनामध्ये छोटासा बदल मोठे परिवर्तन आणू शकतो. नियमित आरोग्य तपासणी, दररोज तीस मिनिटांचा व्यायाम, जंक फूड टाळणे आणि फळे व भाज्या यांचे जास्त सेवन केल्यास तुमच्या आरोग्यामध्ये सकारात्मक बदल घडून येऊ शकतो.
World Heart Day: जीवनशैलीत बदल हाच स्वास्थ्यपूर्ण उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 2:47 AM