>> डॉ. जी. आर. काणे
World Heart Day : काहीवेळा हृदयरोगाची अशी लक्षणे दिसून येतात जी सामान्य भासतात पण प्रत्यक्षात गंभीर कार्डिओव्हॅस्क्युलर (हृदय आणि रक्तवाहिन्यांचे आजार) समस्येचा इशारा देणारी असू शकतात. वरवर पाहता निरुपद्रवी वाटणाऱ्या लक्षणांकडे देखील लक्ष देणे महत्त्वाचे आहे, कारण ती संभाव्य गंभीर हृदयरोगाचा प्रारंभिक इशारा देणारी चिन्हे असू शकतात. अशा काही लक्षणांची माहिती करून घेऊया.
1) थकवा: दगदग, धावपळीच्या दिवसाअखेर थकल्यासारखे वाटणे सामान्य आहे पण सतत थकवा येत असेल आणि आराम केल्यानंतर देखील थकवा जात नसेल तर हे हृदयरोगाचे लक्षण असू शकते. रक्त संपूर्ण कार्यक्षमतेनिशी पंप करण्यासाठी जर तुमच्या हृदयाला खूप जास्त प्रयत्न करावे लागत असतील तर तुमच्या शरीराला पुरेसा प्राणवायू आणि पोषकद्रव्ये मिळू शकत नाहीत आणि त्यामुळे थकवा येत राहतो.
2) श्वास अपुरा पडणे: आधी जी कामे तुम्ही सहज करू शकत होता, उदाहरणार्थ, जिने चढणे किंवा कुत्र्याला फिरवणे इत्यादी, तीच कामे करताना जर आता धाप लागत असेल तर त्याचे कारण धमन्या अरुंद झाल्यामुळे कमी झालेला रक्तप्रवाह हे असू शकते. आराम करत असताना, खासकरून जेव्हा तुम्ही झोपलेल्या अवस्थेत असता तेव्हा देखील धाप लागू शकते, जेव्हा तुम्ही झोपण्याचा प्रयत्न करता तेव्हा धाप लागणे वाढू शकते.
3) पाय, घोटा किंवा पावलांवर सूज येणे: शरीराच्या खालच्या भागात द्रव साठून राहणे किंवा एडिमा हे हृदय निकामी झाल्याचे लक्षण असू शकते. जेव्हा हृदय संपूर्ण क्षमतेने रक्त पंप करू शकत नाही तेव्हा पायांमध्ये द्रव साठून राहतो आणि त्यांना सूज येते. या लक्षणाकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते.
4) छातीमध्ये अस्वस्थता: छातीत वेदना होणे हे हृदयरोगाचे लक्षण आहे हे आपण सर्वजण जाणतो पण जसे सिनेमामध्ये दाखवतात त्याप्रमाणेच छातीत दुखते असे होत नाही. छातीमध्ये अस्वस्थ वाटणे, दाब दिल्यासारखा वाटणे, छाती भरून आल्यासारखे जाणवणे किंवा हलके दुखणे असे प्रकार होऊ शकतात. छातीमध्ये कोणत्याही प्रकारे काही वेगळेपण जाणवत असेल आणि त्यासोबत धाप लागणे किंवा हात, मान किंवा जबडा दुखणे असे प्रकार होत असतील तर तातडीने दवाखान्यात जावे.
5) हृदयाचे ठोके अनियमित असणे (अरिथमिया): अरिथमियामुळे हृदयात धडधड होऊ शकते. काहीवेळा अरिथमियामुळे काही विशेष नुकसान होत नाही पण काहीवेळा मात्र ते हृदयाशी संबंधित समस्येचे लक्षण असू शकते. हे समजून घेण्यासाठी तपासणी करणे आवश्यक असते.
6) चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे: अचानक चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे हे मेंदूतील रक्त प्रवाह कमी झाल्यामुळे होऊ शकते, ज्याचा संबंध हृदयाच्या समस्यांशी असू शकतो. चक्कर किंवा बेशुद्धीमागचे कारण निश्चित करणे महत्त्वाचे असते कारण त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
7) जबडा किंवा घसा दुखणे: आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हृदयाचे दुखणे जबडा किंवा घशापर्यंत पसरू शकते. हे दात किंवा स्नायूंच्या काही समस्यांमुळे होत असावे असे वाटून लोक याकडे दुर्लक्ष करतात पण प्रत्यक्षात हे हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजाराचे प्रारंभिक लक्षण असू शकते.
8) थंड घाम येणे: थंड, चिकट घाम येणे, विशेषत: छातीत अस्वस्थ वाटणे किंवा धाप लागणे, हे हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते.
9) मळमळ किंवा अपचन : सतत मळमळ, उलट्या किंवा अपचन, विशेषत: आहारात काहीही वावगे आलेले नसताना हे त्रास होत राहणे, कधीकधी हृदयाच्या समस्यांशी संबंधित असू शकते.
सामान्य वाटणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे हानिकारक ठरू शकते, जर ही लक्षणे हृदय व रक्तवाहिन्यांच्या आजारांशी संबंधित असतील तर ती जीवघेणी देखील ठरू शकतात. वरीलपैकी कोणतेही लक्षण दिसून येत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधणे गरजेचे आहे.
(लेखक कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई येथे डायरेक्टर, कार्डिओलॉजी आहेत.)