डॉ जी आर काणे, संचालक, कार्डिऑलॉजी, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई
World hypertension day : हायपरटेन्शन अर्थात उच्च रक्तदाब, सर्रास सर्वत्र आढळून येणारा हा आजार 'सायलेंट किलर' आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, हायपरटेन्शनमध्ये रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर निर्माण होणारा रक्तदाब सातत्याने खूप जास्त असतो. हा अतिरिक्त दाब हानिकारक नाही असे वाटू शकते पण यामुळे आरोग्याचे गंभीर नुकसान होऊ शकते, हृदयरोग आणि स्ट्रोक यासारखे जीवघेणे धोके देखील यामुळे संभवतात.
प्रचंड लोकसंख्या आणि बदलती जीवनशैली यामुळे भारतात हायपरटेन्शनचे प्रमाण खूप जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडील माहितीनुसार, आपल्या देशात दर चार वयस्क व्यक्तींपैकी एका वयस्क व्यक्तीला हायपरटेन्शनचा त्रास आहे आणि त्यांच्यापैकी फक्त १२% लोकांचा रक्तदाब नियंत्रणात असतो. ही आकडेवारी एका गंभीर धोक्याची घंटा आहे. बैठी जीवनशैली, वाढलेला ताण आणि आरोग्याला अपायकारक अशा खाण्याच्या सवयी ही यामागची प्रमुख कारणे आहेत.
हायपरटेन्शनशी निगडित असलेले धोके आणि त्यामुळे निर्माण होणारी गुंतागुंत खूप गंभीर आहे. रक्तदाब सातत्याने खूप जास्त असेल तर त्यामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते, हार्ट अटॅक, स्ट्रोक, किडनीचे विकार आणि हृदय निकामी होण्यासारखे अनेक धोके देखील उद्भवू शकतात. एक गोष्ट नीट ध्यानात ठेवा की हायपरटेन्शनची लक्षणे स्पष्टपणे दिसू लागेपर्यंत अनेक वर्षे हा आजार तुमच्या शरीराचे नुकसान करत राहू शकतो. हायपरटेन्शन आहे की नाही याची खात्री करून घेण्यासाठी नियमितपणे आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे जर आजार असेल तर तो वेळीच लक्षात येतो आणि जीवनशैलीमधील बदल व औषधांच्या साहाय्याने त्यावर उपचार करता येतात.
हायपरटेन्शनला 'सायलेंट किलर' म्हटले जाते, याचे प्रमुख कारण म्हणजे बहुतेक लोकांना वाटते की उच्च रक्तदाब ही एक सर्वसामान्य बाब आहे. पण काही चिन्हे, लक्षणे अशी आहेत जी स्पष्टपणे दर्शवतात की शरीरात हा आरोग्यशत्रू दडून बसलेला आहे. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने अनेक गंभीर, जीवघेण्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये -
1) डोकेदुखी - कोणतेही विशेष कारण नसताना, सतत डोके दुखत असेल तर ते अनियंत्रित हायपरटेन्शनचे एक लक्षण आहे. सामान्यपेक्षा जास्त वेळा, सतत जर डोकेदुखी होत असेल तर रक्तदाब तपासून घेणे आवश्यक आहे.
2) श्वास घेण्यात त्रास होणे - हायपरटेन्शन असेल तर कोणतेही शारीरिक काम करताना श्वास घेण्यात त्रास होऊ शकतो. अगदी थोडेसे चालल्यावर किंवा अगदी बोलताना देखील जर दम लागत असेल तर ते उच्च रक्तदाब असल्याचे लक्षण आहे.
3) छातीत दुखणे - उच्च रक्तदाबामुळे हायपरटेन्सिव्ह हृदय रोग होऊ शकतो, यामुळे छातीत दुखणे किंवा अस्वस्थ वाटणे असे त्रास होतात. अचानक छातीत दुखू लागले तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, ती एक गंभीर स्थिती असू शकते.
4) दृष्टी समस्या - हायपरटेन्शनमुळे डोळ्यांमधील रक्तवाहिन्यांचे नुकसान होते, त्यामुळे दृष्टी समस्या निर्माण होतात. अंधुक दिसणे किंवा डोळ्यासमोर तरंगत्या रेषा दिसणे ही अनियंत्रित रक्तदाबाची लक्षणे असू शकतात.
5) लघवीमध्ये रक्त येणे - हे लक्षण किडनीच्या समस्या दर्शवते पण किडनीच्या आजाराचे कारण हायपरटेन्शन असू शकते. जर लघवीमध्ये रक्त येत असेल तर तातडीने डॉक्टरला दाखवा.
6) हृदयाचे ठोके अनियमित असणे - हायपरटेन्शन असेल तर हृदयाला नेहमीपेक्षा जास्त काम करावे लागते, त्यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होतात. हे खूपदा होत असेल तर डॉक्टरकडे जाणे गरजेचे आहे.
ही लक्षणे म्हणजे हायपरटेन्शन आहेच याचा पुरावा नाहीत पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. तुम्हाला जर ही लक्षणे जाणवत असतील तर लक्षात ठेवा फुल टाईम स्पेशालिटी सिस्टिम असलेल्या रुग्णालयातील डॉक्टरकडे जाऊन त्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
हायपरटेन्शनविरोधातील लढ्यामध्ये प्रतिबंधात्मक औषध खूप मोलाची भूमिका बजावते. नियमितपणे तपासणी करून घेणे, निरोगी आहार, नियमित व्यायाम, अल्कोहोलचे सेवन मर्यादेतच करणे, तंबाखूचे सेवन न करणे असे उपाय करून रक्तदाब नियंत्रणात राखता येतो. अनुवांशिक किंवा जीवनशैलीशी संबंधित कारणांमुळे जर तुम्हाला हायपरटेन्शनचा धोका संभवत असेल तर प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचेच नाहीत तर जीवनरक्षक ठरू शकतात. सोडियमचे प्रमाण कमी असलेला आहार घेणे, वजन योग्य राखणे आणि ताणाचे प्रभावी व्यवस्थापन करणे यांचा देखील या उपायांमध्ये समावेश करणे गरजेचे आहे.
हायपरटेन्शन हा जरी सायलेंट किलर असला तरी जागरूकता, वेळच्या वेळी निदान आणि प्रभावी व्यवस्थापन करून तुम्ही त्यापासून दूर राहू शकता. या लक्षणांविषयी जागरूक राहून आणि प्रतिबंधात्मक उपाय करून तुम्ही तुमचे आरोग्य आणि आनंद यांचे हायपरटेंशनपासून रक्षण करू शकता. लक्षात ठेवा, तुम्हीच आहात तुमच्या आरोग्याचे शिल्पकार!