नवी दिल्ली - मलेरिया (Malaria) हा आजार डासांमुळे पसरतो. मलेरियाचे डास अत्यंत घातक असतात. हा डास चावतो त्यावेळेस आपल्या रक्तात पॅरासाईट सोडतो. त्यामुळे लिव्हरला धोका पोहोचू शकतो. फिमेल एनोफिलीज डास चावल्यामुळे मलेरिया होतो. हा डास चावल्यानंतर आपल्या शरीरात पॅरासाईट सोडतो. पॅरासाईट शरीरात गेले की लिव्हरच्या दिशेनं वाढत जातात. मॅच्युअर झाल्यानंतर काही दिवसांनी पॅरासाईट रक्तात जातात आणि त्यामुळे लाल रक्तपेशींवर परिणाम होतो. मलेरियाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 25 एप्रिल हा दिवस जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा केला जातो. या आजाराची लक्षणं आणि उपाय तसंच काय काळजी घ्यायची याबाबत जाणून घेऊया...
मलेरियाची लक्षणं
- मलेरियाच्या रुग्णाला भरपूर थंडी वाजते.
- खूप ताप येतो.
- रुग्णाला खूप घामही येतो.
- डोकेदुखी, मळमळ, उलटी, पोटदुखी, डायरिया ही लक्षणंही जाणवतात.
- अशक्तपणा आणि स्नायूही दुखतात.
- काही रुग्णांना क्रॅम्प्स येतात.
- काही रुग्णांच्या शौचामधून रक्त पडतं.
यापैकी कोणतंही लक्षण आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जाणं आवश्यक आहे.
मलेरियावर वेळीच उपचार केले गेले नाहीत तर हा आजार जीवघेणाही ठरू शकतो. वेळेवर उपचार न झाल्यास रुग्णाच्या डोक्यातील रक्त वाहिन्यांमध्ये सूज येते. फुफ्फुसांमध्ये फ्लुईड जमा होतं. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. यालाच वैद्यकीय भाषेत पल्मनरी एडिमा असं म्हणतात. त्याशिवाय लिव्हर, किडनी आणि प्लीहावर यामुळे परिणाम होतो. लाल रक्तपेशी डॅमेज झाल्यामुळे अशक्तपणा म्हणजे ॲनिमिया होऊ शकतो. रुग्णाला लो-ब्लड शुगरसारखा त्रासही होऊ शकतो.
मलेरियापासून वाचण्यासाठी 'अशी' घ्या काळजी
डास होऊच नयेत यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे. डासांची पैदास रोखली पाहिजे. घराच्या परिसरात स्वच्छता ठेवा. साठलेल्या पाण्यात डासांची पैदास जास्त होते. त्यामुळे घराजवळ पाण्याची डबकी साठू देऊ नका. पावसाळा सुरू होण्याआधी घराजवळच्या नाल्यांची सफाई करा तसंच रस्त्यांवरचे खड्डे बुजवून घ्या. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कीटकनाशकांची फवारणी करत राहा. घर आणि परिसरात कूलर, एसी, झाडांच्या कुंड्या, टायर यामध्ये पाणी साठू देऊ नका. पाण्याच्या टाक्या किंवा साठवलेलं पाणीही योग्य प्रकारे झाकून ठेवा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.