डॉ. विक्रांत शहा, सल्लागार फिजिशियन, इंटेन्सिव्हिस्ट आणि संसर्ग रोग विशेषज्ञ, झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चेंबूर
मुंबईत कोविड रुग्णांमध्ये घट झाल्यानंतर मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. कोरड्याहवामानाच्या तुलनेत पावसाळ्यात डासांची उत्पत्ती अधिक होत असली तरी उन्हाळ्यातही अशा प्रकारचे दिसून येतात. काही प्रतिबंधात्मक उपाय जसे की पूर्ण बाह्यांचे कपडे घालणे, डासांपासूनबचाव करणे,डास प्रतिबंधात्मक फवारणी आणि साचलेल्या पाण्याचा नायनाट असे काही उपाय आपल्याला मलेरिया सारख्या आजाराला प्रतिंबध करण्यास नक्कीच फायदेशीर ठरतात.
डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया यांसारख्या संसर्गजन्य रोगांचा प्रसार वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. संक्रमित मादी अॅनोफिलीस डासांच्या चाव्याव्दारे लोकांमध्ये पसरणाऱ्या प्लास्मोडियम परजीवीमुळे एखाद्याला मलेरिया होऊ शकतो. गरोदर स्त्रिया, लहान मुले आणि वृद्धांना मलेरियाचा अधिक धोका असतो. मलेरिया असलेल्या रुग्णांमध्ये ताप, थंडी वाजून येणे आणि डोकेदुखी यांसारखी लक्षणे दिसून येतात.
उपचार न केल्यास, मलेरियामुळे मृत्यू होऊ शकतो किंवा अशक्तपणा, यकृत निकामी होणे, श्वसनासंबंधी त्रास , मूत्रपिंड निकामी होणे, रक्तातील साखरेची पातळी कमी होणे आणि निर्जलीकरण यांसारख्या गुंतागुंत होऊ शकतात. गर्भधारणेदरम्यान मलेरियामुळे गर्भपात, मृत बाळ जन्माला येणे आणि अकाली जन्म होण्याचा धोका असतो.
डॉक्टरांनी सांगितलेली मलेरियाविरोधी औषधे घेऊन मलेरियावर उपचार करता येतात. घराबाहेर पडताना पूर्ण बाह्यांचे, घट्ट आणि हलक्या रंगाचे कपडे घाला. डास प्रतिबंधात्मक फवारणी करणे, झोपताना मच्छरदाणी वापरणे, उकळलेले पाणी पिणे आणि संतुलित आहार घेणे उपयुक्त ठरू शकते .
तुम्ही घराबाहेर असताना मच्छर प्रतिबंधक औषधांचा वापर करा आणि घराभोवती स्वच्छता राखा, कुंड्यांमधील पाण्याचा वेळोवेळी निचरा करा, पाणी साचू देऊ नका, सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवा आणि तज्ञांनी सुचविल्याप्रमाणे रोगप्रतिबंधक उपाय (प्रतिबंधात्मक उपाय) वापरा.