- शीतलकुमार कांबळे सोलापूर : छातीत दुखायला लागले की कोणताही व्यक्ती हृदयविकाराच्या काळजीने त्वरित उपचाराचा प्रयत्न करतो. हृदयविकार ही जशी मेडिकल इमर्जन्सी समजण्यात येते, तशाच प्रकारे आत्महत्येचा विचार आलेल्या व्यक्तीवर 'सायकॅट्रिक इमर्जन्सी' मध्ये त्वरित उपचार करण्याची खरी गरज असते.हृदयविकाराच्या धक्क्याने आपला जीव जाऊ शकतो याची सर्वांनाच कल्पना असते. त्यामुळे छातीत दुखायला लागले तर रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक रुग्णाला उपचासाठी त्वरित घेऊन जातात. डॉक्टर तपासणी करुन पुढे काय करायचे हे सांगतात. त्याचप्रमाणे मनोविकाराचे देखील आहे. मात्र, पूर्वापार समजामुळे याकडे दुर्लक्ष केले जाते. हा आजार आहे, त्याला उपचाराची गरज असल्याचे अजूनही अनेकांना वाटत नाही.उदासीनता, नैराश्य, कधी एकदम उत्साह तर कधी उदासीनता, व्यक्तिमत्त्वातील अस्वस्थता, व्यसनाधीनता अशा मनाच्या दोलायमान स्थितीचे प्रकार मेंदूच्या विकारातून पाहावयास मिळतात. भावनिक आंदोलनातून मग मेंदूचा तोल जातो व अघटित घटना घडतात. मानसिक उपचार वेळीच मिळाल्यास त्या टाळता येतात, असे मानसशास्त्रज्ञ सांगतात.कोरोनामुळे तणावात वाढ...कोरोनामुळे अनेक बेकार झाले, आर्थिक संकट आले. जवळच्या व्यक्तीच्या अंत्यविधीला जाता न आल्याने अनेकांना वाईट वाटले. घराबाहेर पडलो तर आपणाला काय भीती, बैचेनी, चिंता, एकटेपणा यात वाढ झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.मानसिक आजाराबाबत अनेकामध्ये गैरसमज आहेत, ते आधी दूर व्हायला हवेत. आत्महत्येचा विचार मनात आल्यास ‘सायकॅट्रिक इमर्जन्सी’ समजून मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार करून घ्यावेत. यामुळे एखाद्या व्यक्तीची आत्महत्या टाळता येणे शक्य होते. मानसिक आजाराबाबत आपण सर्वांनी बोलते होण्याची गरज आहे. ज्यायोगे मनुष्याच्या मानसिकतेची जाणीव होऊ शकते आणि त्यावर तातडीने उपचार होऊ शकतात. - डॉ. हर्षल तडसरे, मानसोपचार तज्ज्ञ, सोलापूर
जागतिक मानसिक आरोग्य दिन: ‘आत्महत्येचा विचार’ ही सायकॅट्रिक इमर्जन्सी!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 3:07 AM