(डॉ. एन आर शेट्टी, कन्सल्टन्ट, इंटर्नल मेडिसिन , कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल)
World Mosquito Day : डासांमुळे होणाऱ्या संसर्गांचा उपद्रव संपूर्ण वर्षभर होत असला तरी पावसाळ्यात याचे प्रमाण खूप वाढते. भारतात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, झिका, फिलारियासिस, व्हायरल एंसिफिलाइटिस हे डासांमुळे होणारे, सर्वाधिक आढळून येणारे संसर्ग आहेत.
मोठ्या प्रमाणावर पसरणारे साथीचे रोग आणि स्थानिक पातळीवरील आजार या आपल्या देशासाठी काही नवीन समस्या नाहीत. भारतात डासांच्या तब्बल ४०० प्रजाती आढळून येतात, त्यांच्यापैकी प्रत्येकामध्ये संसर्ग पसरवू शकतील असे जीव असतात आणि त्यामुळे अशा संसर्गांचा उद्रेक वारंवार होत असतो.
डासांवर आता कीटकनाशकांचा काहीही परिणाम होत नसल्याने आणि त्यांच्या गुणधर्मांमध्ये झालेल्या बदलांमुळे, हल्लीच्या काळात असे आजार पुन्हा होऊ लागले आहेत जे आधी जवळपास नष्ट झाले होते. डासांमुळे होणारे, सर्वाधिक प्रमाणात आढळून येणारे आजार पुढीलप्रमाणे आहेत:
मलेरिया:
मलेरिया प्रोटोझोआचे चार प्रकार आहेत परंतु व्हायव्हॅक्स आणि फॉल्सीपेरम हे प्रोटोझोआला सर्वात जास्त कारणीभूत ठरतात.
फॉल्सीपेरम मलेरियामध्ये सेरेब्रल ताप आणि शारीरिक प्रणालीमध्ये गुंतागुंत निर्माण होत असल्याने हा गंभीर ठरू शकतो.
हा आजार संसर्ग झालेल्या ऍनाफिलिस डासामार्फत एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला पसरतो. खूप जास्त ताप, थंडी वाजणे, थरथरणे, डोकेदुखी आणि उलट्या ही सर्वसामान्य लक्षणे आहेत. काही रुग्णांमध्ये, खास करून फॉल्सिपेरम संसर्गांमध्ये प्लेटलेट्सची संख्या कमी होणे, कावीळ, किडनी व श्वसनसंस्था निकामी होणे असेही त्रास होऊ शकतात.
गर्दीच्या, अस्वच्छ ठिकाणी मलेरिया सर्रास आढळून येतो. क्लिनिकल वैशिष्ट्ये, तापाच्या पॅटर्न्स, ब्लड स्मीयर आणि मलेरियल अँटीजेन टेस्टिंग यावरून आजाराचे निदान केले जाते. अंगात ताप असताना घेतलेल्या रक्तावरून सर्वात अचूक निष्कर्ष काढले जाऊ शकतात. रक्ततपासणीबरोबरीनेच इलेक्ट्रोलाईट्स, यकृत व किडनी यांच्या तपासण्या देखील केल्या जाऊ शकतात.
मलेरियावरील उपचारांमध्ये भरपूर द्रव पदार्थांचे सेवन करून शरीर हायड्रेटेड ठेवण्यास सांगितले जाते. औषधांमध्ये क्लोरोक्वीन, आर्टेमिसिनिन ग्रुप, टेट्रासायक्लिन्स इत्यादींचा समावेश होतो. जिथे आजार पटकन पसरू शकेल अशा ठिकाणी जाणे टाळण्यास सांगितले जाते. परजीवींचा यकृतामध्ये प्रवेश होऊ नये यासाठी व्हायव्हॅक्स मलेरियामध्ये प्रायमाक्वीन दिले जाते.
डेंग्यू ताप
डेंग्यू विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे ताप येऊन होणाऱ्या या आजाराचे प्रमाण पावसाळा व हिवाळ्यात खूप वाढते. सर्वसामान्यतः दिवसाच्या वेळी डास चावल्याने हा आजार होतो.
डेंग्यू ताप सौम्य असू शकतो, त्यामुळे रक्तस्त्राव होऊ शकतो (हॅमरेजिक) किंवा त्यामुळे डेंग्यू शॉक सिंड्रोम देखील होऊ शकतो. ताप ४ ते ५ दिवस टिकतो, डोके भरपूर दुखते, सांधे व अंग दुखते, पाठीच्या खालच्या भागात वेदना होतात, डोळे दुखतात - ही या आजाराची सर्वसामान्य लक्षणे आहेत. काही केसेसमध्ये त्वचेवर लाल चट्टे उठणे, खाज येणे असे प्रकार देखील होऊ शकतात. शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी भरपूर प्रमाणात रक्तस्त्राव होणे, शरीरातील अनेक अवयव निकामी होणे, रक्तदाब कमी होणे आणि संपूर्ण शरीर यंत्रणा कोलमडणे असे गंभीर प्रकार देखील होऊ शकतात.
सिरीयल प्लेटलेट आणि अँटीजेन टेस्टिंग यासारख्या लक्षणांवरून आजाराचे निदान केले जाते. डेंग्यूच्या विरोधात काम करू शकतील अशी कोणतीही औषधे किंवा विषाणूविरोधी उपचार उपलब्ध नाहीत, त्यामुळे उपचार हे मुख्यतः आजाराच्या लक्षणांवर केले जातात. द्रव पदार्थांचे भरपूर प्रमाणात सेवन करून शरीर हायड्रेटेड ठेवणे, रक्त प्लेटलेट्स ट्रान्सफ्यूजन करणे यांचा यामध्ये समावेश होतो. रुग्णाची अवस्था अतिशय गंभीर झालेली असल्यास त्याला संपूर्ण वेळ वैद्यकीय देखभाल मिळावी यासाठी रुग्णालयात भरती करून क्रिटिकल केयर द्यावी लागू शकते. रुग्णालयात रुग्णावर सतत लक्ष ठेवले जात असल्याने तो अधिक चांगल्या प्रकारे बरा होऊ शकतो.
चिकनगुनिया:
हा विषाणू थेट डासाच्या चाव्यातून पसरवला जातो.
ताप, थंडी वाजणे, सौम्य ते गंभीर प्रमाणात सांधेदुखी, डोकेदुखी व त्वचेवरील लाल चट्टे अशी लक्षणे दिसून येतात. हा विषाणू संसर्ग झालेला असल्यास होणाऱ्या सांधेदुखीमुळे कमजोरी येते, जी अनेक दिवस, आठवडे, महिने आणि काही केसेसमध्ये त्याहीपेक्षा जास्त काळ टिकून राहते.
रक्ताच्या नमुन्यावर आयजीजी, आयजीएम, आरटी पीसीआर टेस्ट्स करून आजाराचे निदान केले जाते.
यावर कोणतीही विशिष्ट थेरपी उपलब्ध नसल्याने उपचारांमध्ये द्रव पदार्थांचे भरपूर प्रमाणात सेवन, नॉन-स्टिरॉइडल एनालजेसिक्स आणि लक्षणांवरील उपचारांसाठी अँटिव्हायरल्सचा समावेश केला जातो.
झिका ताप:
हल्लीच्या काही वर्षांमध्ये भारतात झिका तापाच्या काही केसेस आढळून आल्या आहेत. स्नायू दुखणे, डोकेदुखी, ताप, त्वचेवरील चट्टे, डोळे दुखणे, डोळे गुलाबी होणे ही झिका तापाच्या संसर्गाची सर्वसामान्य लक्षणे आहेत. याशिवाय झिका संसर्ग झालेल्या गर्भवती महिलांचा गर्भपात होण्याचा आणि नवजात बाळामध्ये जन्मजात दोष उत्पन्न होण्याचा देखील संभव असतो.
आयजीएम-एलिसा अँटीबॉडीज टेस्टिंग करून आजाराचे निदान केले जाते.
इतर अनेक डासजन्य संसर्गांप्रमाणे, झिका तापावरील उपचार देखील लक्षणांवर केले जातात. उपचारांदरम्यान असुरक्षित संभोग करणे टाळावे जेणेकरून संसर्ग अधिक जास्त पसरणे टाळता येऊ शकते.
फिलारियासिस
डासाच्या चाव्यातून होणारा आणि पसरणारा हा संसर्ग आहे.
खूप जास्त ताप, थंडी वाजणे, अंग थरथरणे (खासकरून रात्री), पाय किंवा आजारग्रस्त भाग सुजणे, लालसरपणा, स्क्रोटमसारख्या ग्रंथी वाढणे ही सर्वसामान्य लक्षणे आहेत. हत्तीरोग हा फिलारियासिसमुळे होतो.
खासकरून मध्यरात्री अंगात ताप असताना ब्लड स्मीयर टेस्टिंग करून आजाराचे निदान केले जाते. डीसीसी अँटिबायोटिक्स आणि त्याला पूरक अशी औषधे देऊन क्लिनिकल उपचार केले जातात.
डासांमुळे होणारे आजार टाळण्यासाठी हे नक्की करा:
• घरात व आजूबाजूच्या भागात नीट स्वच्छता राखा.
• डास चावू नयेत यासाठी शरीर संपूर्ण झाकले जाईल असे कपडे वापरा, तसेच स्किन क्रीम्सचा वापर करा.
• डासांपासून संरक्षण करणाऱ्या जाळ्या, पलंगावर मच्छरदाणी तसेच डासनाशके यांचा वापर करून डास चावणे आणि त्यामुळे रोगांचा संसर्ग होणे टाळले जाऊ शकते.
• घर, सोसायटी व आजूबाजूच्या भागात कीटकनाशकांची पुरेशा प्रमाणात फवारणी करून घ्यावी.
• खुल्या जागांमध्ये पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्या. फुलदाण्या, रबरी टायर, काचपात्रे, कारंजी इत्यादींमध्ये पाणी साठू देऊ नये आणि त्यांवर कीटकनाशकांची फवारणी करावी.
• वर नमूद करण्यात आलेल्यांपैकी कोणतीही लक्षणे जाणवत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.