पुणे : पुण्यातील रिक्षाचालकाच्या १६ वर्षीय मुलीला तीन महिन्यांपूर्वी क्षयराेगाचे निदान झाले. मात्र, गेल्या एक महिन्यापासून त्यांना औषधांचा तुटवडा जाणवायला लागला. मुलीसाठी औषध घेण्यासाठी ते हेलपाटे मारत होते. शेवटी ते पुणे महानगरपालिकेच्या क्षयरोग केंद्रात गेले. तेथे त्यांना सांगितले गेले की, औषधे मिळतील; पण फक्त २ दिवसांसाठीच! केवळ पुण्यातच नव्हे तर राज्यभरात क्षयराेगाच्या औषधांसाठी दाही दिशांना वणवण करत फिरावे लागत आहे.
क्षयराेगाचा विळखा कमी करण्यासाठी दरवर्षी २४ मार्च हा ‘जागतिक क्षयराेग दिन’ पाळण्यात येताे. केंद्र शासनाने २०२५ ला क्षयराेग निर्मूलन करण्याचेही ध्येय ठेवलेले आहे. क्षयराेगाची औषधे केंद्राकडून राज्याला येतात. मात्र, येथे राज्य क्षयरोग विभागाच्या काही औषधकेंद्रांना औषधांचा पुरवठा नाही!
केंद्रीय क्षयरोग विभागाने १८ मार्चला सर्व राज्य क्षयरोग अधिकाऱ्यांना पत्र पाठविले. औषध तुटवड्यावर मात करण्यासाठी स्थानिक खरेदी सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
आराेग्य विभागाने क्षयरोगाच्या औषधांच्या खरेदीसाठी निविदा काढल्या आहेत. १५ दिवसांत या औषधांची खरेदी करणार असून, ती सर्व केंद्रांना पुरवण्यात येतील. - डॉ. सुनीता गोल्हाईत,सहसंचालक (टीबी)