प्रत्येक जण दिवसातून किमान एकदातरी अंघोळ करतो. अंघोळ केल्यानंतर अंग पुसण्यासाठी टॉवेलचा उपयोग केला जातो. तसंच अनेक जण अंघोळनंतर ओला टॉवेल अंगाभोवती (Towel Wrapping) गुंडाळतात. अंघोळ केल्यानंतर अंगाभोवती ओला टॉवेल गुंडाळून बराच वेळ घरात फिरण्याची सवय अनेकांना असते.
अनेकांना सावरियाँ चित्रपटामधल्या (Saawariya) रणबीर कपूरप्रमाणे (Ranbir Kapoor) टॉवेल गुंडाळून फिरण्याचा शौक असतो. सावरियाँ चित्रपटातल्या 'जब से तेरे नैना' (Jab Se Tere Naina) या गाण्यात रणबीरने पांढरा टॉवेल गुंडाळून डान्स केला होता. त्याचा हा डान्स फेमस झाला होता. त्यामुळे टॉवेल गुंडाळून फिरण्याचा ट्रेंड आणखी प्रसिद्ध झाला होता. पण, या सवयीमुळे आजारांची लागण होऊ शकते, याची कल्पना आहे का?
टॉयलेटमध्ये आढळतात, तसे जंतू अस्वच्छ आणि ओल्या टॉवेलवर असू शकतात, असं अमेरिकेतल्या (USA) अॅरिझोना ( University of Arizona) विद्यापीठात करण्यात आलेल्या एका संशोधनातून अनेक वर्षांपूर्वी सिद्ध झालं होतं. टॉवेलवर आढळणारे जंतू अनेक आजारांना जन्म देतात. त्यामुळे टॉवेल वापरताना काळजी घेणं आवश्यक आहे. अस्वच्छ टॉवेल वापरल्याने फूड पॉयझनिंग आणि अतिसाराचा (Diarrhea) धोका वाढतो, असं या संशोधनातून समोर आलं आहे.
अंघोळीनंतर टॉवेल वापरताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. अंघोळीनंतर टॉवेलचा वापर केल्यावर तो उन्हात वाळवावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. यामुळे टॉवेलवरचे धोकादायक बॅक्टेरिया मरतात. तसंच टॉवेल आठवड्यातून किमान 3 वेळा धुवावा, असंही तज्ज्ञांनी सांगितलं आहे. अनेकांना अंघोळीनंतर टॉवेल वापराला की तो तसाच सोडून ठेवण्याची सवय असते. यामुळे टॉवेल सुकत नाही आणि त्यामध्ये ओलावा राहतो. टॉवेलमध्ये जास्त वेळ ओलावा राहिल्यानेदेखील हानिकारक बॅक्टेरिया निर्माण होतात. अशा परिस्थितीमध्ये ओलसर टॉवेल वापरला, तर हे बॅक्टेरिया शरीरात प्रवेश करतात आणि ज्यामुळे रोग पसरू शकतात
प्रत्येकाचा स्वतःचा एक स्वतंत्र टॉवेल असावा. दुसऱ्याचा टॉवेल वापरणं देखील धोकादायक असतं. आजार टाळण्याचा उत्तम उपाय म्हणजे कुटुंबातले सदस्य, रूम पार्टनर किंवा मित्र यांचा टॉवेल कधीही वापरू नका. तसा वापरला, तर त्यातून इतर व्यक्तीच्या शरीरात असलेला आजार तुमच्यापर्यंत पसरू शकतो.
ओला टॉवेल गुंडाळून फिरण्याची हौस असली, तरी ती सवय बंद करा. कारण, यातून आजारांना आमंत्रण मिळतं. टॉवेलमध्ये असलेले हानिकारक बॅक्टेरिया आरोग्याला हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे वेळीच सावध होण्याची गरज आहे.