मुंबई - आताच्या धकाधकीच्या व स्पर्धेच्या युगात स्वतःच्या शरीराची योग्य पद्धतीनं देखभाल करणं कित्येकांसाठी अशक्य असंच झाले आहे. धावपळ, अपूर्ण झोप, वेळी-अवेळी जेवणं, व्यायाम न करणं इत्यादी कारणांमुळे शारीरिक समस्या प्रचंड निर्माण होतात. ब-याचदा लॅपटॉप, कम्प्युटरसमोर बसून काम करायचे असल्यानं तीव्र पाठीदुखीची समस्या सर्वांनाच सहन करावी लागते. या जीवघेण्या पाठीदुखीच्या समस्येतून तुम्हाला कायमस्वरुपी सुटका हवी आहे का? यासाठी तुम्हाला दैनंदिन जीवनात नियमित योगासनांचा अभ्यास करावा लागेल आणि योगासने करणे तुम्हाला फायदेशीरदेखील ठरेल.
पाठदुखीच्या त्रासापासून मुक्तता मिळवण्यासाठी या आसनांचा सराव करावा 1. त्रिकोणासन त्रिकोणासनामुळे दंडाचे स्न्यायू, पायाचे स्नायू आणि ओटीपोटाचे स्नायू कार्यक्षम होतात. तसंच पाठीचा कणा लवचिक बनतो. पाठीचा चांगला व्यायामही होतो.
2. पवनमुक्तासन पवनमुक्तासनामुळे नितंबांच्या (Buttocks) सांध्यांना अधिक रक्तपुरवठा होतो. पाठीच्या खालील भागावर पडलेला ताण नष्ट होतो. शक्यतो हे आसन तुम्ही योगा-मॅट किंवा जाड टॉवेलवर करा. हे आसन केल्याने तुमच्या पाठीच्या खालच्या भागातले स्नायू बळकट होण्यास मदत मिळते.
- या आसनाच्या दीर्घ अभ्यासानं गॅसेसचा त्रास कमी होतो.- पचन व उत्सर्जन संस्थांची कार्य व्यवस्थित चालतात.- पोटात विशेषतः ओटीपोटात होणार रक्तसंचय दूर होण्यासही मदत होते.- पोट व ओटीपोटावरील चरबी घटण्यास मदत होते.
3. परिवर्तित चक्रासन - मेरुदंडाचा लवचिकपणा वाढतो व त्यामुळे त्यातून जाणारे मज्जातंतू कार्यक्षम होतात. - चालण्या-बसण्याच्या चुकीच्या सवयीमुळे मेरुदंडास आलेली एका बाजूची वक्रता नाहीशी होते.- कंबर,पोटी व छाती यांच्या बाजूनं स्नायू आकुंचनामुळे व ताणामुळे लवचिक व दृढ होतात. कंबर व पोटावरील चरबी घटण्यास मदत होते. - ज्यांना स्लिप डिस्क, सायटिका यांसारखे मेरुदंडाचे तीव्र दोष, तीव्र पोटदुखी असल्यास हे आसन करणे टाळावे.
4. पर्वतासन
- पर्वतासनामध्ये मेरुदंडाला चांगला ताण मिळतो. या आसनाच्या सरावामुळे पाठ दुखी कमी होण्यास हळूहळू मदत मिळते. पर्वतासनाच्या अंतिम स्थितीत शरीराला पर्वताप्रमाणे आकार येतो, म्हणून या आसनास पर्वतासन असे म्हणतात. - पाठीच्या कण्यावर जास्त ताण निर्माण होतो, यामुळे पाठीच्या कण्यातील मणत्यांमधील भागात रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते. - मेरुदंडातील वक्रतेचे किरकोळ दोष दूर होण्यास मदत मिळते. - छातीचा पिंजरा लवचिक बनून श्वसनक्षमता वाढते. श्वसनसंबंधित दोष दूर होतात.- छातीचा स्नायूतील अतिरिक्त ढिलेपणा व अतिरिक्त ताठपणा नष्ट होण्यास मदत होते.- आसनाच्या नियमित अभ्यासानं उंची वाढण्याच्या वयात (वय 14 ते 18) उंची वाढण्यास मदत होते.
5. मार्जारासन – संस्कृतमध्ये मांजराला मार्जार असे म्हणतात. - पाठीचा कणा लवचिक व सुदृढ होतो. - अती प्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीनं काम केल्यामुळे होणा-या कंबर व मानेच्या दुखण्यातून सुटका होते. - मेरुदंडाच्या मानेतील व कंबरेतील भागाला या आसनांमुळे आराम मिळतो. मेरुदंडाशी जोडलेल्या नाड्या सशक्त होतात. - आळस दूर करण्यामध्ये मदत होते व मन ताजेतवाने बनते.
6. भुजंगासन - (फणा काढलेल्या सापासारखा आकार) - भुजंगासनामुळे पाठीच्या स्नायू संकोचामुळे मेरुदंडाचे लहान लहान स्नायू व पाठीचे स्नायू दृढ होतात. पाठीच्या कण्यातील रक्ताभिसरण सुधारते. - पाठीच्या कण्याचा लवचिकपणा टिकतो व वाढतो. - मान, पाठ व कंबर यांची अतिश्रमामुळे निर्माण झालेली दुखणी नाहीशी होतात. - खुर्चीवर बसून पुढे वाकून लेखन, अभ्यास, चित्रकला, आर्किटेक्चर वगैरे टेबलवरील काम करणा-यांना हे आसन अत्यंत आवश्यक आहे. - सवयीमुळे आलेली पाठीची वक्रता, कुबड आणि खांदे खाली व पुढे घेण्याची सवय या आसनाच्या नियमित अभ्यासानं कमी होतात.
7. धनुरासन- धनुरासनामुळे कंबर आणि पोटाचे स्नायू बळकट होतात आणि संपूर्ण पाठीचा कणा लवचिक होतो. - धनुरासनाच्या नियमित सरावानं मेरुदंड लवचिक होतो.- कण्यातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.
8. नौकासन - या आसनात कंबर, पाठ, मान, पार्श्वभागातील स्नायू बळकट होतात. कंबरदुखी, पाठदुखी टाळण्याच्या दृष्टीनं नौकासनाचा सराव करणं फायदेशीर आहे. - पाठीच्या कणा बळकट होतो व त्याचे आरोग्य वाढते.
पाठदुखीपासून कसे दूर राहता येईल?1. शरीराचे वजन दोन्ही पायांवर सारखे ठेवा.2. नियमित योगासनांचा सराव करत राहा.3. शरीराचे योग्य वजन राखा.4. पाठीला नियमित ताण देऊन पाठीचे स्नायू बळकट करा.5. प्राणधारणादेखील तितकीच महत्त्वाची आहे.
योगासने करताना लक्षात ठेवण्याचे महत्त्वपूर्ण मुद्दे 1. योगासने सावकाश आणि काळजीपूर्वक करा. चुकीच्या पद्धतीने ही आसने तुम्ही जर केलीत तर त्याचे वाईट परिणाम शरीरावर होतात. यामुळे पाठीचे दुखणे अधिक वाढण्याची शक्यतादेखील असते. 2. योगासनांचा सराव करण्यासाठी योग शिक्षकांकडून ते आधी योग्यरित्या समजून घ्या.3. शरीरावर ताण येणार नाही, याची काळजी घ्यावी .4. तुम्हाला स्लीप डिस्कसारख्या गंभीर आजारांचा त्रास असेल तर योगासनांचा सराव करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचं आहे.