Exercise for Body Relax : बदलत्या काळात शारीरिक मेहनत कमी आणि एकाच जागेवर बसून तासंतास काम करण्याची पद्धत जास्त रूळली आहे. काही आयटी कंपन्यांमध्ये तर 8 तासांपेक्षा जास्त वेळ एकाच जागेवर बसून काम करावं लागतं. दिवसभर एकाजागी बसून आणि एकसारखं कॉम्प्युटरकडे बघून आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्याही होतात. खासकरून अनेकांना पाठदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, खांदेदुखी अशा समस्या रोज होतात. पण बरेच जण एका गोळी घेऊन किंवा बाम लावून ही समस्या दूर करण्यावर भर देतात. पण आज आम्ही तुम्हाला एक सोपा व्यायाम सांगणार आहोत.
रोज दोन ते तीन मिनिटांचा हा व्यायाम करून तुम्ही शरीरात आलेला दिवसभराचा थकवा, दुखणं, वेदना दूर करू शकता. योगा एक्सपर्ट प्रणाली कदम यांनी इन्स्टा अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करून हा व्यायाम कसा करावा आणि त्याने काय होतो हे सांगितलं आहे.
प्रणाली कदम यांच्यानुसार, एक टॉवेल घ्या आणि दोन्ही हातांनी दोन्ही टोकांवर पकडा. त्यानंतर हात टॉवेलच्या मदतीने खाली वर करा. 2 ते 3 मिनिटे तुम्ही असंच करा. त्यानंतर दोन्ही टोकांवरील हात जवळ आणा. ही क्रिया तुम्ही रोज काही मिनिटे करू शकता.
कदम यांच्यानुसार रोज हा एक सोपा आणि कमी वेळाचा व्यायाम कराल तर तुमच्या दिवसभराचा ताण-थकवा दूर होण्यास मदत मिळेत. महत्वाची बाब म्हणजे हा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळही लागणार नाही. जे लोक एकाच जागी तासंतास बसून काम करत असतील त्यांच्यासाठी हा व्यायाम फार फायदेशीर आहे.