मुंबई - बदलती जीवनशैली, जीवघेणी स्पर्धा, लठ्ठपणा, वेळी-अवेळी खाण्यामुळे पोट-कंबरेवरील वाढणारी चरबी यामुळे अनेक शारीरिक समस्या उद्भवतात. यातील सर्वांचीच गंभीर समस्या म्हणजे पोट सुटणे, यामुळे शारीरिक रचनाच बिघडल्यासारखी वाटते. म्हणजेच फिगरची 'ऐसी की तैसी' झाल्यासारखं दिसतं. मग मेन्टेन राहण्यासाठी आपण जीम, कसरती, व्यायाम, डाएट इत्यादी गोष्टींकडे आपला मोर्चा वळवतो. मात्र शारीरिक लवचिकता वाढावी आणि कोणत्याही दुष्परिणामाविना वजन घटावे, असं वाटत असल्यास योगाभ्यास करावा.
कोणत्याही वयात पोटाचा घेर कमी करण्यासाठी योगासने एक उत्तम उपाय ठरतील. वजन कमी करण्यासाठी व फिगर मेन्टेन ठेवण्यासाठी आपण पाच योगासनांबाबत माहिती जाणून घेऊया
1. भुजंगासन -भुजंगासनाचा अभ्यास केल्यानं कंबर व पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते. खांदेदेखील मजबूत होतात. पाठीच्या कण्याच्या आरोग्याच्या दृष्टीनेदेखील हे एक उत्तम आसन आहे. मात्र, मानदुखी, पाठदुखी, हर्निया असल्यास भुंजगासन करू नये. भुजंगासनामुळे पाठीच्या कण्यातील रक्ताभिसरण सुधारते, पाठीच्या कण्याचा लवचिकपणा वाढतो आणि श्वसन, पचन आणि उत्सर्जन क्रिया सुधारते.
2. पश्चिमोत्तानासन -पश्चिमोत्तानासन पोटावरील ताण येत असल्यानं पोटाचा घेर वाढला असल्यास तो कमी होतो. मात्र, नियमित अभ्यासानंच शारीरिक बदल जाणवतील. हे आसन केल्याने तुम्ही आजारापासून तर दूर राहालच तसेच तुमचे शरीर लवचिक राहील. शिवाय, शरीराच्या पाठीकडील बाजूचे स्नायू, विशेषत: मांडीच्या मागील आणि कमरेचे स्नायू जास्त लवचिक बनवतात. पाठीच्या कण्यावरील ताणामुळे तेथील रक्ताभिसरण सुधारतं व मणक्यांतून निघणा-या नाड्या (मज्जातंतू) अधिक कार्यक्षम बनतात. पचनक्षमताही सुधारते.
3. सेतुबंधासन -प्रथम पाठीवर झोपावे. दोन्ही गुडघे वाकवून शरीराच्या जवळ उभे करावेत. दोन्ही पायांमध्ये साधारण खांद्याएवढे अंतर असावे. दोन्ही हात शरीरालगत असावेत. पाय गुडघ्यात सरळ होईपर्यंत पोट व कंबर वरती उचलावे. श्वसन संथ सुरु ठेवावे. काही सेकंद या आसनस्थितीत राहिल्यानंतर, हळुवारपणे पुन्हा मूळस्थितीत यावे. (मणक्याचे विकार असणा-या व्यक्तिंनी हे आसन मार्गदर्शनाशिवाय करु नये.)
4. धनुरासन - धनुरासनामुळे शरीराचे स्नायू दृढ आणि लवचिक होतात. पचनसंस्थेचे कार्य सुधारते. पोट, पाठ, मान, छाती, हात, पाय यांसारख्या अवयवांना एकचवेळी उत्तम आणि योग्य ताणाची स्थिती मिळाल्याने, शरीराला होणारा लाभ वृद्धिंगत होतो. तसंच पाठीचा वक्रदोष नष्ट होतो. कमरेची आणि मानेची दुखणी कमी होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोटांचे स्नायू खेचले गेल्यामुळे पोटाची अतिरिक्त चरबी कमी होते.
5. चक्की चलनासन - चक्की चलनासन पोटाची चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. या योगात वजन कमी करण्यात मोठी मदत होते.