- मयूर पठाडेधुम्रपान हे पूर्वी एक स्टाइल स्टेटमेंट होतं.. धुम्रपान करणं हे मर्दपणाचं मानलं जात होतं आणि जनमानसात त्याचा रुबाबही होता.. अर्थातच त्याला काही कारणंही होतं. चित्रपटांत, जाहिरातीत हमखास हिरो धुम्रपान करणारा दाखवला जायचा आणि त्याचं उदात्तीकरणही खूप मोठ्या प्रमाणावर व्हायचं. त्यामुळे आपणही असंच करावं, असं तरुणांना वाटायला लागायचं. अर्थात हे प्रमाण अजूनही फार कमी झालं आहे, असं नाही, पण धुम्रपान करणारी व्यक्ती ‘मॅनली’ असतेच असं नाही किंवा तसं काही नसतं इतकं तरी लोकांना तरुणांना पटलेलं आहे.त्यामुळेच आजकाल चित्रपटांत धुम्रपानाचा सिन असला तर ‘धुम्रपान करणं आपल्या आरोग्यासाठी घातक आहे’ अशी स्ट्रीप त्या प्रसंगांत दाखवणं सक्तीचं करण्यात आलं आहे. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानावर बंदीही घालण्यात आली आहे. आता कोणी विचारेल, सक्तीनं काय होतं? अशानं काही होतं का? त्यासाठी लोकांची मनं बदलली पाहिजेत आणि त्यांनी स्वत:हूनच तशी कृती केली पाहिजे.
अशा लोकांसाठी आता ब्रिटननं एक उदाहरण घालून दिलं आहे. २००७मध्ये त्यांच्याकडे सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यावर बंदी घालण्यात आली. त्यामुळे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आणि हमखास धुम्रपान होतं अशा पब्ज, क्लब्ज, बार्स, रेस्टॉटरण्ट्स.. इत्यादि ठिकाणी धुम्रपानावर बंदी घालण्यात आली.बरोब्बर दहा वर्षांनी त्याचं सर्वेक्षण करण्यात आलं. या दहा वर्षांत लोकांच्या धुम्रपानाच्या सवयीत काही बदल झाला का? झाला असेल तर कोणता? का? यासंदर्भात १६ ते २४ या वयोगटातील अनेक तरुणांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या.या पाहणीचा निष्कर्ष उत्साहवर्धक आहे. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानावर बंदी घालण्यापूर्वी धुम्रपान करणाऱ्यांची जेवढी संख्या होती, त्यापेक्षा जवळपास वीस लाखांनी ही संख्या दहा वर्षानंतर कमी झाली आहे. २००७मध्ये धुम्रपान करणाऱ्यांची संख्या जवळपास सव्वा कोटी होती. २०१६ मध्ये करण्यात आलेल्या पाहणीनंतर हीच संख्या ८३ लाखापर्यंत खाली आल्याचं दिसून आलं!एवढंच नाही, धुम्रपानाकडे पाहण्याचा लोकांचा अॅटिट्यूडही आता बदलला आहे. धुम्रपानाचं सामाजिक स्टेटस तुलनेनं खूपच कमी झालेलं आहे. तरुणांचा धुम्रपानाकडे असलेला ओढा कमी झाला आहे.
धुम्रपान करणाऱ्या, पण नंतर सोडलेल्या अनेकांचा अभ्यास करण्यात आला. त्यांनीही यासंदर्भात आवर्जून सांगितलं, आम्ही धुम्रपानाकडे परत वळलो नाही, यात सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानावर असलेल्या बंदीचा परिणामही खूपच मोठा होता. अनुकम्रे सुमारे वीस टक्के आणि १४ टक्के तरुणांनी सांगितलं, आमचं धुम्रपानाचं व्यसन कमी करण्यात आणि पूर्णपणे सुटण्यात या कायद्याचा खूप मोठा हातभार आहे!
याशिवाय हा निष्कर्ष सांगतो, दहापैकी चार, म्हणजे तब्बल ३८ टक्के तरुणांना धुम्रपानापासून दूर राखण्यात या कायद्यानं महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे!आणि हो, ब्रिटनमध्ये कॅन्सरचं प्रमाणही त्यामुळे खूपच कमी झालं.सक्तीचाही फायदा होतो तो असा..कायदा आणि त्याची अंमलबजावणी जर योग्य तऱ्हेनं झाली तर त्याचा फायदा होतोच होतो.. हेदेखील या अभ्यासानं दाखवून दिलं आहे.