मुंबई: वाढत्या मानसिक तणावाचा परिणाम व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर होत असतो. तरुणांवर तर याचा अतिशय गंभीर परिणाम होत असल्याचं एका संशोधनातून समोर आलंय. मानसिक तणावामुळे स्मरणशक्तीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारा मेंदूतील भाग आकुंचन पावत असल्याची धक्कादायक माहिती संधोधनातून पुढे आलीय. या समस्येचा सर्वाधिक सामना तरुणांना करावा लागतोय. यामुळे तरुणांमध्ये विस्मृतीचा धोका वाढतोय. मानसिक ताण-तणावाचे मेंदू आणि स्मरणशक्तीवर होणारे परिणाम यावर राम मनोहर लोहिया रुग्णालयाच्या डॉक्टरांनी संशोधन केलं. यामध्ये 67 रुग्णांचा सहभाग होता. यातील नेमके कितीजण तणावाखाली आहेत?, तणावाचा शरीरावर काय परिणाम होतो?, यासाठी दीड वर्ष संधोशन करण्यात आलं. यामधून समोर आलेले निष्कर्ष अतिशय चिंताजनक आहेत. 67 पैकी 30 टक्के रुग्ण तणावाखाली असल्याचं यातून समोर आलं. स्मरणशक्तीशी निगडित असणाऱ्या 'हिपोकॅम्पस'चा आकार कमी होत असल्याची चिंताजनक माहितीदेखील यातून पुढे आली. राम मनोहर लोहिया रुग्णालयातील न्यूरोलॉजिस्ट डॉ. विकास धिकव यांनी संशोधनाच्या निष्कर्षांबद्दल दिलेली माहिती चिंताजनक आहे. 'तणावाच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी सर्व रुग्णांच्या मेंदूचा एमआरआय काढण्यात आला. यानंतर त्यांच्या मेंदूतील हिपोकॅम्पसच्या आकाराचं मोजमाप करण्यात आलं. जे फार तणावग्रस्त नव्हते, त्यांच्या हिपोकॅम्पसचा आकार सर्वसाधारण होता. मात्र जास्त तणावाखाली असलेल्यांच्या हिपोकॅम्पसचा आकार लहान झाला होता. त्यामुळेच सध्या विस्मरणाचा आजार वाढतोय. तरुणांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढत असेन हे प्रमाण अतिशय चिंताजनक आहे,' असं धिकव यांनी सांगितलं.
काळजीचं कारण... तरुणांच्या मेंदूचा आकार कमी होतोय, विस्मृतीचा धोका वाढतोय!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2018 11:13 AM