Health Tips : अनेकदा वृद्धापकाळात किंवा वयाची पासष्टी ओलांडल्यानंतर काही जणांना गोष्टींचा विसर पडू लागतो. त्याला स्मृतिभ्रंश असेही म्हणतात. वैद्यकीय भाषेत याला अल्झायमर असेही संबोधले जाते. ज्या व्यक्तींना हा आजार होतो, त्यांना नियमित भेटणाऱ्या व्यक्तींची नावेसुद्धा लक्षात राहत नाहीत. अल्झायमर या आजारात मज्जातंतूला हानी पोहोचते. जगभरात या आजराचे रुग्ण असून, यावर ठोस असा उपचार मिळालेला नाही.
या आजाराचे निदान होताच वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. औषधोपचाराने या आजाराची काही लक्षणे कमी करण्यास मदत होते. तसेच गरज पडल्यास निवडक चाचण्या करून त्यांना योग्य उपचार करता येऊ शकतात.- डॉ. निर्मल सूर्या, न्यूरो फिजिशियन, बॉम्बे हॉस्पिटल
लक्षणे कोणती?
घरातील नियमित वस्तू कुठे ठेवल्या आहेत ते लक्षात राहत नाही. पूर्वी एखाद्या ठिकाणी जाऊन आलो तरी त्या व्यक्तीला काहीच आठवत नाही. संवाद साधताना अचूक शब्द सुचत नाहीत, व्यक्ती अडखळत बोलू लागते. काहींना स्वत:चे नावही लक्षात राहत नाही. वय झाले असे समजून अनेकदा या आजाराकडे दुर्लक्ष केले जाते.
कारणे काय?
काही वेळेला हा आजार आनुवंशिक असण्याची शक्यता वर्तविली जाते.
वयोमानानुसार हा आजार ६५ वयानंतर होण्यास सुरुवात होते. तर मधुमेह, रक्तदाबाच्या तक्रारीमुळेसुद्धा हा आजार होतो.
आधुनिक जीवनशैली त्यासोबत धूम्रपान आणि मद्यपान करणाऱ्यांना हा आजार होऊ शकतो. त्यामुळे या सर्व गोष्टींपासून दूर राहून दैनंदिन जीवनशैलीत योग्य ते बदल करून संतुलित आहार आणि दररोज व्यायाम करणे गरजेचे आहे.
या आजाराचा तीन टप्प्यांतून प्रवास...
१) अल्झायमर आजाराचा प्रवास हा विविध टप्प्यांतून होत असतो. सुरुवातीच्या टप्प्यात स्मरणशक्ती कमी होते.
२) एखाद्या कामाचे नियोजन करताना अडचणी निर्माण होतात. तसेच काम करताना मनस्थिती ठीक नसते, तर त्याच्या पुढच्या टप्प्यात दैनंदिन कामाकरिता त्या व्यक्तीला घरातील अन्य सदस्यांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागते.
३) तिसऱ्या टप्प्यात त्या व्यक्तीची विचार करण्याची क्षमता पूर्णपणे गमावली जाते. त्यांना अन्न गिळण्यासही त्रास होतो. या टप्प्यात रुग्ण अंथरुणाला खिळून राहतो.