नवी दिल्ली : कॅडिला हेल्थकेअर या समूहाची कंपनी असलेल्या झायडस कंपनीने अहमदाबादमधील प्रकल्पात कोरोना विषाणुंच्या संसर्गावरील झायकोविड ही प्रतिबंधक लस तयार केली आहे. या लसीच्या माणसांवर चाचण्या करण्यास केंद्र सरकारने झायडसला परवानगी दिली. हे प्रयोग या महिन्यापासून सुरू होतील.
माणसांवर चाचण्या करण्याआधीचे सर्व प्रयोग झायडसने यशस्वी पूर्ण केले आहेत. सूत्रांनी सांगितले, देशभरातील विविध ठिकाणी एक हजार व्यक्तींवर झायकोविड लसीच्या चाचण्या या महिन्यापासून सुरू करण्याचे कंपनीने ठरविले आहे. ही लस स्वदेशात बनविली असून त्यामुळेही तिला विशेष महत्त्व आहे.
ड्रग कंट्रोलर जनरल आॅफ इंडिया व सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल आॅर्गनायझेशन (सीडीएससीओ) यांनी या लसीच्या माणसांवर चाचण्या करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या करण्यात येतील. त्यांचे निकष समाधानकारक असल्यास मग मानवी चाचण्यांच्या तिसºया टप्प्यासाठी झायडस कंपनीला परवानगी देण्यात येईल. झायडस कंपनीच्या सूत्रांनी सांगितले की, उंदीर, ससे आदी प्राण्यांवर झायकोविड या लसीच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये ही लस कोरोनाचा संसर्ग बरा करण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे दिसून आले.सात कंपन्या, संस्थांकडून प्रयोगभारत बायोटेकनंतर झायकोविड या प्रतिबंधक लसीला परवानगी देण्यात आली. देशात कोरोना संसर्गावर लस बनविण्याचे सात कंपन्या, संस्थांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यातील दोनच कंपन्यांच्या लसींना माणसांवरील चाचण्यांसाठी परवानगी देण्यात आली आहे.