कोल्हापूर : ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्याने रिक्षा व टॅक्सीचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेली महिनाभर वाहने दारात लावून आहेत, डोक्यावर कर्ज आणि पोटातील आग यामुळे हा घटक अडचणीत आला असून राज्य शासनाने त्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी टॅक्सी, सहाआसनी रिक्षा, विद्यार्थी वाहतूक रिक्षा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली.
‘लॉकडाऊन’मुळे हातावर पोट असणाऱ्यांचे आबाळ झाले आहे. रोज व्यवसायासाठी घराबाहेर पडल्याशिवाय चूल पेटत नाही, अशी अवस्था रिक्षा, टॅक्सीचालकांची आहे. गेला महिनाभर ही वाहने दारात लावून आहेत. बॅँकेच्या कर्जाचा हप्त्याची चिंता आहे. आगामी काळात लॉकडाऊन उठले तरी व्यवसाय थंडच राहणार आहे. त्यामुळे बॅँकेचे कर्ज आणि पोट कसे चालवयाचे असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. यासाठी राज्य शासनाने प्रत्येकाला १५ हजार रुपये मदत द्यावी. वाहनांचे नूतनीकरण करणे, विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी, बॅँकेचे हप्ते भरण्यासाठी किमान सहा महिन्यांची मुदतवाढ व या कालावधीतील व्याज माफ करावे, अशी मागणी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. यावेळी अध्यक्ष संजय सावंत, प्रकाश कांदळकर, अमर चव्हाण, आदी उपस्थित होते.