वसमत ( हिंगोली ) : एका ट्रकमधून काळ्याबाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनचा ११ टन गहू आणि तांदळाचा साठा वसमत ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे. औंढ्याकडून नांदेड जिल्ह्यातील उमरीकडे हा साठा अवैधरित्या जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
राशनचे धान्य काळाबाजारात विक्रीसाठी एका ट्रकमधून जात असल्याची माहिती वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याला मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलीस उपनिरीक्षक डी. पी. शिंदे व त्यांच्या पथकाने बोराळा परिसरात सापळा लावला. दुपारी चार वाजेच्या सुमारास बोराळा पाटी येथे पोलिसांनी एका ट्रकला ( क्रमांक एम.एच २६ ए डी २०८२ ) थांबवून तपासणी केली. ट्रकमध्ये अवैधरीत्या राशनच्या धान्याची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. हा ट्रक धान्य घेऊन औंढाकडून नांदेड जिल्ह्यातील उमरीकडे घेऊन जात होता. ट्रकमध्ये गहू व तांदूळाचा असा एकूण ११ टन साठा पोलिसांनी जप्त केला.
पोलिसांनी कारवाई करत धान्य १ लाख ७० हजार रुपये व ट्रक ८ लाख रुपये किंमतीची असा एकूण ९ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.यावेळी पोलिसांनी चालक मेहबूब बेग यास ( रा. तळेगाव तालुका उमरी ) ताब्यात घेतले आहे. ही कारवाई या पथकात पोलीस उपनिरीक्षक डीपी शिंदे, नामदेव बेंगाळ व इतर कर्मचाऱ्यांनी केली. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती