हिंगोली : गत दोन-तीन दिवसांपासून पूर्णा नदीवरील ११ गावांमध्ये पाऊस पडत आहे. त्यामुळे सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरले आहे. मंगळवारी धरणाचे ६ दरवाजे ३ फुटाने तर अन्य ६ दरवाजे २ फुटाने उघडले होते. बुधवारी मात्र एकूण बाराही दरवाजे ३ फुटाने उघडले आहेत. त्यामुळे पूर्णा नदीवरील खालच्या २२ गावांना सतर्क राहण्याचा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे.
दोन-तीन दिवसांपासून रात्रीच्यावेळेला धरणाच्या वरती असलेल्या ११ गावांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात अधिकच वाढ होत आहे. आजमितीस धरणात जिवंत पाणीसाठा ८०.९६ द. ल. घ. मी. आहे. त्यामुळे धरण प्रशासनाने तहसीलदार कृष्णा कानगुले यांना कळवून २१ सप्टेंबर रोजी धरणाचे ६ दरवाजे ३ फुटाने तर ६ दरवाजे २ फुटाने उघडले होते. धरणातील पाणी लक्षात घेऊन २२ सप्टेंबर रोजी बाराही दरवाजे ३ फुटाने उघडले आहेत. मंगळवारी औंढा तालुक्यातील रुपूर, धार, अन्नखळी, पोटा (बु), पिरजाबाद, नांदखेडा, बेरुळा, परभणी जिल्ह्यातील जोडपरळी, सावंगी (खुर्द), संबर, पिंपळगाव, पांढरी, राहटी, उखळद, कानजापूर, कानडखेडा, सुखी, ममदापूर, कानेगाव, निळा, नंदगाव आदी नदीकाठावरील २२ गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नदी काठावर कोणीही जाऊ नये; पशुधनाची काळजी घ्यावी
सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरल्यामुळे धरणाचे बारा दरवाजे तीन फुटाने उघडून पाणी पूर्णा नदीत सोडले आहे. यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तालुका प्रशासनालाही याबाबत कळवले आहे. नदीकाठावरील गावकऱ्यांनी काठावर जाऊ नये तसेच पशुधनालाही नदीकाठावर जाऊ देऊ नये, असेही आवाहन धरण प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
- भूषण कणोज, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभाग