महसूल विभागाची कारवाई ; वाळूमाफियांचे धाबे दणाणले
औंढा नागनाथ : तालुक्यात मागील काही महिन्यांपासून अवैध वाळू वाहतूक जोरात सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार वाळूमाफियांनी वेगवेगळ्या ठिकाणी अवैध वाळूचा उपसा करून साठविलेल्या साठ्यावर महसूल विभागाच्या पथकाने कारवाई करत १२५ ब्रास वाळूसाठासह १० लाखांचा मुद्देमाल २१ डिसेंबर राेजी जप्त केला आहे. या कारवाईने वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. हिंगाेली नंतर ही जिल्ह्यातील दुसरी माेठी कारवाई आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील दरेगाव, पोटा शेळके शिवारात अज्ञातांनी वाळूसाठा करून ठेवल्याची माहिती औंढा तहसीलदार कृष्णा कानगुले यांना मिळाली. उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलच्या पथकाने कारवाईचे नियाेजन केले. २१ डिसेंबर राेजी पहाटे घटनास्थळी पथकाने कारवाई करत येथील वाळूसाठा जप्त केला. यानंतर वाहनांद्वारे हा साठा औंढा नागनाथ तहसील कार्यालय परिसरात आणण्यात आला. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.
दरम्यान हा वाळूसाठा जवळपास १२५ ब्रासचे बाजार मूल्य अंदाजित १० लाख रुपयांचा असल्याची माहिती महसूलच्या वतीने सांगण्यात आली आहे.
औंढा नागनाथ तहसीलदार कानगुले यांनी पदभार घेतल्यानंतर केलेल्या कारवाईने तालुक्यातील वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. ही कारवाई नायब तहसीलदार सचिन जोशी, नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, मंडलाधिकारी भगवान घुगे, मंडलाधिकारी राऊत, तलाठी बाळासाहेब हरण, अनिल पाथरकर, अव्वल कारकून शरद नाईकनवरे, कोतवाल संदीप मुंडे, कैलास जाधव यांचा पथकाने केली आहे.