लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत तालुक्यातील १३५ गावांनी सहभाग घेतला असून उर्वरित गावेही या स्पर्धेत सहभाग घेणार असल्याची माहिती पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक प्रणील नागरे यांनी दिली.१३५ गावांनी स्पर्धेत भाग घेत असल्याचे स्वीकृतीपत्र पाणी फाऊंडेशनकडे दिले आहे. २७ गावात या स्पर्धेत भाग घेण्यासाठी ग्रामसभा घेण्यात आल्या. २५ गावात प्रत्येकी ५ प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. वरुड, टाकळगव्हाण ही दोन गावे १० जानेवारीपर्यंत स्पर्धेत भाग घेणार असल्याचे नागुरे यांनी सांगितले.प्रत्येक गावात ५ -प्रशिणार्थी निवडून त्यांना फाऊंडेशनच्या वतीने ४ दिवसांचे निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे. फेब्रुवारी, मार्च महिन्यात प्रशिक्षण दिले जाणार आहे. ही स्पर्धा १०० गुणांची होणार आहे. यात स्पर्धा सुरू होण्यापूर्वी शोषखड्डे तयार करणे, माती परीक्षण, रोपवाटिका, पाणी बचतीचे तंत्रज्ञान, आग पेटीमुक्त शिवार याला २५ गुण, श्रमदान-२०, यांत्रिकीकरण-२०, कामाच्या गुणवत्तेला १० गुण, पाण्याचे अंदाजपत्रक ५ गुण, जुन्या रचनेची दुरूस्ती त्यात विहीर पुनर्भरण, पाणलोट उपचार या कामांना राहणार आहेत. ३१ जानेवारीअखेर ११० गावात ग्रामसभा घेवून प्रशिक्षणार्थ्यांची निवड केली जाणार आहे. गावांनी सहभाग नोंदवावा, यासाठी पाणी फाऊंडेशनचे प्रणील नागरे, संदीप बेळे, भागवत कोटकर हे गावोगावी जाऊन मार्गदर्शन करीत आहेत. तालुक्यातील सर्व महसूली गावे यात सहभाग घेणार आहेत. या स्पर्धेच्या माहितीसाठी व जलसंधारणाच्या कामाची माहिती व्हावी, यासाठी तहसील कार्यालयात दोनवेळा सरपंच, उपसरपंच, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांना मार्गदर्शन करण्यात आले. स्पर्धेचा कालावधी ८ एप्रिल ते २२ मे असा ४५ दिवसांचा राहणार आहे. यात राज्य स्तरावर पहिले बक्षीस ७५ लाख, दुसरे ५० लाख तर तिसरे ४० लाख रुपये राहणार आहे. तालुका स्तरावर सर्वोतम कामगिरी करणाºया ग्रा.पं. ला १० लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे. जलसंधारणाची सर्व कामे श्रमदानातून केली जाणार आहेत. राज्यातून दरवर्षी चांगली कामे करणारी टॉप १० गावे फाऊंडेशनच्या वतीने निवडली जातात.
वॉटरकप स्पर्धेत १३५ गावांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 10:47 PM