लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सध्या मैत्रेय कंपनीत गुंतवणूक केल्यानंतर फसवणूक झालेल्यांच्या तक्रारी दाखल करण्यास पोलीस अधीक्षक कार्यालयात रांगा लागत आहेत. जिल्ह्यातील लाखावर गुंतवणूकदारांची १५ कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.मैत्रेय समुहाच्या विविध वित्तीय अस्थापनांमार्फत ठेवीदारांच्या झालेल्या आर्थिक फसवणुकीप्रकरणी राज्यात एकूण ३0 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर गुन्ह्यांच्या तपास व कार्यवाहीमध्ये समन्वयासाठी संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरू असून निष्पन्न झालेल्या मालमत्ता जप्ती करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यांची कायदेशीर विल्हेवाट लावण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. तसेच उर्वरित मालमत्ता जप्तीबाबतचीही कार्यवाही सुरू आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्याची कार्यवाही सक्षम अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या पोलीस अधीक्षक कार्यालयात गुंतवणूकदारांच्या तक्रारी एकत्रित करण्याचे काम केले जात आहे. दररोज हा ओघ वाढतच चालल्याचे चित्र आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता धक्कादायक बाब समोर आली. यातील गुंतवणूकदार व एजंटांच्या मते जिल्ह्यात किमान एक लाख जणांना मैत्रेयने भुरळ घातली असावी. त्यात किमान १५ कोटी रुपये विविस्थ वित्तीय अस्थापनांमार्फत गुंतवल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे आणखी काही दिवस पोलिसांमागील डोकेदुखी कायम राहणार आहे. ज्यांनी गुंतवणूक करून बॉण्ड कंपनीकडेच जमा केलेले आहेत, अशांची अडचण होत आहे. पावत्या असताना त्यांची तक्रार दाखल करून घेतली जात नाही. त्यामुळे अशांचा प्रश्न कसा सुटणार? हे न उलगणारे कोडे आहे. ज्यांच्याकडे बॉण्ड आहेत, अशांची तक्रार मात्र लगेच नोंदवून घेतली जात आहे.आमची रक्कम शासनाच्या मदतीने लवकरात लवकर मिळाली तर अनेकांना दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रया गुंतवणूकदार संतोष जावळे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
लाखावर गुंतवणूकदारांची १५ कोटींची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:17 AM