लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सातत्याने वाढत जाणाऱ्या वीजबिलाच्या थकबाकीचा डोंगर कमी करण्यासाठी महावितरणने कंबर कसली असून मागील २५ दिवसांत हिंगोली जिल्हयातील सर्वच वर्गवारीतील १५८६ थकबाकीदार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. या मोहिमेत ३ कोटी ४२ लाख रुपयांची वसूली करण्यात आली. धडक मोहिमेमुळे मात्र थकबाकीदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.वीज बिलांच्या थकबाकीमुळे महावितरणला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महावितरणच्या हिंगोली मंडळाने थकबाकी वसुलीसाठी तीव्र मोहिम राबविण्यास सुरवात केली आहे. हिंगोली जिल्हयामध्ये कृषीपंप ग्राहक वगळता इतर सर्व वर्गवारीतील २८५७ वीजग्राहकांकडे १५ कोटी ४१ लाखांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील २५७५ वीजग्राहकांकडे ३ कोटी २० लक्ष रुपयांची थकबाकी आहे. पथदिव्यांच्या 16 वीजग्राहकांकडे २ कोटी २१ लक्ष तसेच २३८ पाणीपुरवठा योजनांकडे ९ कोटी ९७ लक्ष रुपये थकबाकी आहे. १ डिसेंबरपासून सुरु केलेल्या थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत करण्याच्या कारवाईमध्ये मागील २६ दिवसांत ११५७ वीजग्राहकांचा तात्पुरत्या स्वरुपात वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. तर ४२९ वीजग्राहकांचा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. सदर मोहिमेत २ हजार ३४८ वीजग्राहकांकडुन ३ कोटी ४२ लाखांची वसुली करण्यात आली आहे. पुढील काळात ही मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार असल्यामुळे थकबाकीदार वीजग्राहकांनी आपल्या थकबाकीसह चालू महिन्याचे वीज देयक त्वरीत भरून घेण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. जिल्ह्यात महावितरणकडून थकित वीजबिल धडक वसुली मोहीम सुरू आहे.वीजबिल भरण्यासाठी महावितरणच्या वीजदेयक भरणा केंद्र सोबतच मोबाईल अॅप, इंटरनेट बँकींगव्दारे, डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड, पेटीएम आदी सुविधा चोवीस तास उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. त्यामुळे वीजग्राहकांनी वीजबिलाचा त्वरीत भरणा करावा व वीज पुरवठा खंडीत करण्याचे टाळावे असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्हाभरात वसूली पथकाद्वारे थकीत विजबिल ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे महावितरणच्या वीजदेयक भरणा केंद्रात भरून घेण्याचे आवाहन केले.ग्राहकांकडे वीजबिले थकल्यामुळे महावितरणला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे थकबाकीदार वीज ग्राहकांनी थकीत बिलभरणा करावा असे आवाहन महावितरणकडून केले आहे.
१५८६ ग्राहकांची वीज केली खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 11:59 PM