हिंगोली: कोरोना महामारीमुळे मागील चार महिन्यांमध्ये बसेस बंदच होत्या. त्यामुळे आगाराला मोठा तोटा सहन करावा लागला. परंतु, शासनाच्या आदेशानुसार बसेस सुरु झाल्यामुळे एस. टी. महामंडळाच्या उत्पन्नात झपाट्याने वाढ होत आहे. प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. १६ दिवसांमध्ये हिंगोली आगाराने ४४ लाख १५ हजार ८८१ रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले असून, परभणी विभागात हिंगोली आगाराचा प्रथम क्रमांक आला आहे.
मागील दीड वर्षापासून कोरोना महामारीने सर्वत्र कहर केला आहे. आजमितीस कोरोना ओसरत चालला असला तरी कोरोनाचे रुग्ण रोजच आढळून येत आहेत. कोरोना महामारीचे रुग्ण वाढू नये म्हणून शासनाने खरबदारी घेत महामंडळाच्या बसेस बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात घट झाली होती. ६ जूनपासून शासनाने महामंडळास बसेस सुरु करण्याबाबत परवानगी दिली आहे. ७ जून ते २१ जून या दरम्यान हिंगोली आगाराने ४४ लाख १५ हजार ८८१ रुपयांचे उत्पन्न एस. टी. महामंडळास मिळवून दिले आहे. ७ जून रोजी ८४ हजार २३८ रुपये, ८ जून रोजी १ लाख १५ हजार ३९२ रुपये, ९ जून रोजी १ लाख ८३ हजार ७६ रुपये, १० जून रोजी २ लाख ४२ हजार १ रुपये, ११ जून रोजी २ लाख ७१ हजार ९६९ रुपये, १२ जून रोजी २ लाख ९३ हजार १३३ रुपये, १३ जून रोजी ३ लाख ३ हजार २५१ रुपये, १४ जून रोजी ३ लाख ४८ हजार ८५० रुपये, १५ जून रोजी ३ लाख ६९ हजार ५४३ रुपये, १६ जून रोजी ३ लाख ७९ हजार ८८९ रुपये, १७ जून रोजी ४ लाख १५ हजार १८० रुपये, १८ जून रोजी ३ लाख ८६ हजार ७६ रुपये, १९ जून रोजी ३ लाख ६२ हजार ६२० रुपये, २० जून रोजी ४ लाख २८ हजार ७२८ रुपये तर २१ जून रोजी ४ लाख ११ हजार ८७० रुपये एवढे उत्पन्न झाले आहे.
सद्यस्थितीत हिंगोली आगाराच्या बसेस १५ हजार किलोमीटर धावत आहेत. ग्रामीण भागासाठी परवानगी दिल्यास किलोमीटरमध्ये वाढ होऊ शकते. कोरोना ओसरत चालला असला तरी रुग्ण रोजच आढळून येत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागातील बसेस सुरु करण्याबाबत परवानगी दिलेली नाही. सद्यस्थितीत सोलापूर, कोल्हापूर, पुणे, लातूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद, नांदेड, अकोला, परभणी आदी लांब पल्ल्यांच्या बसेसला परवानगी दिलेली आहे.
हिंगोली ते हैदराबाद बस सुरु
जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार कोरोना नियम पाळत २२ जून पासून हिंगोली आगाराने हिंगोली ते हैैदराबाद ही बस सुरु केली आहे. सकाळी ६.३० वाजेदरम्यान ही बस हैदराबादला निघते. दुसऱ्या दिवशी हैदराबाद येथून सकाळी १० वाजता ही बस निघून हिंगोली येथे रात्री ९ वाजे दरम्यान पोहोचते. कोरोना महामारी लक्षात घेऊन सर्व चालक, वाहक व कर्मचाऱ्यांना कोरोना नियम पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. जे चालक-वाहक कोरोना नियम पाळणार नाहीत त्यांची ड्यूटी बंद करण्यात येईल, अशीही ताकीद देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाचा आदेश आल्यास ग्रामीण भागातील बसेस सुरु करण्यात येतील.
-संजयकुमार पुंडगे, स्थानकप्रमुख, हिंगोली आगार