जिल्ह्यातील हजारो वाहनांवर कोट्यवधींचा दंड प्रलंबित आहे. ज्या वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून शिक्षापात्र व तडजोडपात्र अपराध केला आहे. मात्र, तो दंड अर्थात चलन अद्याप अदा केले नाही, अशा वाहनधारकांकडून दंड वसूल करण्याची मोहीम पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सध्या हिंगोली शहरात २० सप्टेंबरपासून ही मोहीम सुरू आहे. मागील पाच दिवसांत हिंगोली शहरातील इंदिरा चौक, नांदेड नाका आदी परिसरात वाहनांची तपासणी केली जात आहे. ज्या वाहनांवर थकीत दंड आहे, अशा वाहनधारकांकडून रकमेचा भरणा करून घेतला जात आहे. २४ सप्टेंबरपर्यंत ३ हजार ९०५ वाहनधारकांनी दंड भरला आहे. त्यानुसार जवळपास १६ लाखांचा दंड वसूल झाला आहे. यात २०० रुपयांपासून ते १० हजार ६०० रुपयांच्या दंडाच्या रकमेचा समावेश आहे. वाहनधारकांना त्यांना प्राप्त एसएमएसवरील लिंकवरून अथवा कोणत्याही जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन थकीत रकमेचा भरणा करता येणार असल्याची माहितीही पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी दिली. दरम्यान, शुक्रवारी नांदेड नाका परिसरात शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, शहर ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक गंगाधर बनसोडे, चव्हाण, फुलाजी सावळे, तान्हाजी खोकले, शेषराव राठोड, घुमणर, सांगळे, सुभाष घुगे, रवी गंगावणे, बळीराम शिंदे, गजानन राठोड, सुषमा भाटेगावकर, मोटे आदी कर्मचाऱ्यांनी वाहनांची तपासणी केली.
जिल्हाभरात मोहीम राबविणार
वाहनधारकांकडे थकीत असलेली रक्कम वसूल करण्याची मोहीम हिंगोली शहरात सुरू आहे. यापुढे आता प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत ही मोहीम राबविली जाणार आहे. तशा त्या त्या ठाणेदारांना सूचना दिल्या असून वाहतूक शाखेचे कर्मचारीही मदतीला असणार असल्याची माहितीही पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी दिली.