हिंगोली : जिल्ह्यात कोरोना काळात २०२० मध्ये अल्पवयीन बालकांसदर्भात ५७ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये २४ अल्पवयीन बालकांचे अपहरण झाले आहे. त्यात १७ अल्पवयीन मुलींचा समावेश आहे.
एनसीआरबी (नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो) चा २०२० चा अहवाल नुकताच जाहीर झाला आहे. यात जिल्ह्यातील अल्पवयीन बालकांसंदर्भातील गुन्ह्यात घट झाल्याचे पाहावयास मिळत आहे. २०१८ ला अपहरणाच्या ३५ घटना घडल्या होत्या. त्यात २०१९ मध्ये वाढ होऊन ४४ घटना घडल्या. मात्र, २०२० मध्ये कोरोना काळात बहुतांश वेळ अल्पवयीन बालके पालकांच्या निगराणीखाली होती. घरातच मुले अडकून पडल्याने गुन्ह्यात घट झाल्याचे पाहावयास मिळत आहे. २०२० मध्ये अल्पवयीन बालकांच्या अपहरणाच्या २४ घटना घडल्या आहेत. यात १७ मुली व ७ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. कोरोना काळात अल्पवयीन मुलांच्या अपहरणाच्या घटना रोखण्यात कोरोनाचा हातभार लागला आहे.
१४ मुलींचा शोध घेण्यात यश
जिल्ह्यात २०२० मध्ये १७ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले होते. त्यापैकी पोलिसांनी १४ मुलींचा शोध घेऊन पालकांच्या स्वाधीन केले आहे. तर तीन मुलींचा शोध घेतला जात आहे. तसेच ७ अल्पवयीन मुलांपैकी ६ मुले शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.
विनयभंगाच्या व बलात्काराच्या प्रत्येकी १५ घटना
जिल्ह्यात २०२० मध्ये अल्पवयीन मुलांसदर्भात ५७ घटना घडल्या आहेत. याप्रकरणी त्या - त्या पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल झाले आहेत. यात विनयभंगाच्या १५ घटना घडल्या असून तितक्याच घटना बलात्काराच्या घडल्या आहेत.
जिल्ह्यातील एकूण बेपत्ता
मुले - ०७
मुली -१७
२०२० मध्ये ३ बालकांचा खून
खून - ०३
खुनाचा प्रयत्न - ००
बलात्कार - १५
आत्महत्या - ००
भ्रूणहत्या - ००
मारहाण - ००
अपहरण - २४
सायबर क्राइम - ००
विनयभंग - १५
बलात्काराचा प्रयत्न - ००