हिंगोली : यंदाही जिल्हा शिक्षक पुरस्कार ५ सप्टेंबरला वितरित होतील की नाही, याची शंका असून जिल्ह्यातील १७ शिक्षकांनी मात्र या पुरस्कारासाठी प्रस्ताव दिले आहेत. प्रस्ताव सादर करण्यासाठी शिक्षकांचीही अनास्था दिसून येत आहे.
दरवर्षीच जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम वेळेवर होत नाही. बहुतेकवेळा हे प्रस्तावच विलंबाने येतात. यंदाही तीच गत आहे. जुलै महिन्यात शिक्षण विभागाने प्रस्ताव मागविल्यानंतरही प्रस्तावच नव्हते. ऑगस्टपर्यंतही हे पुरस्काराचे प्रस्ताव स्वीकारण्यात आले. आता हे प्रस्ताव आल्यानंतर जि.प.अध्यक्ष, सभापतींच्या उपस्थितीत होणारी बैठक झाल्यानंतर विभागीय आयुक्तांकडे या पुरस्कारांसाठीच्या नावांची शिफारस होणार आहे. त्यानंतर मान्यता मिळेल. पुढच्या आठवड्यात ही बैठक होणे अपेक्षित आहे. त्यात न झाल्यास यंदाही पुरस्कार वितरण लांबणीवर पडणार हे निश्चित आहे.
असे आले प्रस्ताव
औंढा तालुक्यातून प्राथमिकचे तीन, कळमनुरी तालुक्यातून प्राथमिकचे २ तर माध्यमिकचा १, सेनगाव तालुक्यातील माध्यमिकचे २, प्राथमिकचे २ व विशेष शिक्षकाचा १ प्रस्ताव आला आहे. वसमतमधून प्राथमिकचे ३ तर माध्यमिकचा एक व हिंगोलीतून प्राथमिक व माध्यमिकचा प्रत्येकी एकच प्रस्ताव आला आहे. कळमनुरी वगळता इतर तालुक्यांमध्ये कोणतीच स्पर्धा दिसत नाही. प्रस्तावही कमी आहेत.
दोन वर्षांचे पुरस्कार लटकलेलेच
२०१८-२० या दोन वर्षांच्या कालावधीतील पुरस्कार वितरणही अजून झाले नाही. या काळातील शिक्षकांचे जे प्रस्ताव आले होते. त्यातून निवडीची प्रक्रियाही झाली. मात्र तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे गेले नाहीत. त्यामुळे निवडच अंतिम नाही. परिणामी, पुरस्कार वितरण नाही. मागच्या वर्षीच्या पुरस्कारांचे वितरणही मागच्या महिन्यात झाले.