हिंगोली : येथील राज्य राखीव पोलीस भरती घोटाळ्यातील आॅपरेटर दिनेश गजभार या आणखी एका आरोपीस पोलिसांनी मंगळवारी नांदेडमधून अटक केली आहे. त्यामुळे अटक केलेल्या आरोपींची संख्या १७ झाली आहे. हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस भरती २०१३, २०१४ व २०१७ या कालावधीत उमेदवारांना निकष डावलून पोलीस भरती प्रक्रियेत समाविष्ट करून घेण्यात आले होते. नांदेड पोलीस भरती घोटाळ्यानंतर हिंगोलीतही हा घोटाळा समोर आल्याने राज्यभरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी हिंगोली शहर ठाण्यात एकूण २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्याकडे तपास आहे. पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी पथके नेमण्यात आली. विविध ठिकाणी कारवाई करून आतापर्यंत १७ आरोपींना अटक केल्याची माहिती मदने यांनी दिली. १९ जून रोजी नांदेड येथून आॅपरेटर दिनेश गजभार यास अटक केल्याचे त्यांनी सांगितले.आतापर्यंत यांना झाली अटकयापूर्वी पोलीस पथकाने अमोल विठ्ठल मांदळे, भगवान सुखदेव बोरूडे, बाळकृष्ण नामदेव वाघमारे, महादेव रामचंद्र पोवार, विठ्ठल संतोष खरात, विकास फुलचंद डोळे, आॅपरेटर शिरीष बापूसाहेब अवधूत, शुक्राचार्य बबन टेकाळे, सतीश विलासराव अंभोरे, सुरेश विश्वनाथ चव्हाण, वैभव श्रीरंग आंधळे, सुरेश सारंगधर जाधव, विशाल कदम, आॅपरेटर स्वप्निल साळुंखे, नामदेव बाबुराव ढाकणे, शेख फकीर शेख छोटेमियाँ यांना अटक करण्यात आली.
पोलीस भरती घोटाळ्यात १७वा आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 6:00 AM